मनुदेवीचा धबधबा पहिल्‍याच पावसात ओसंडून वाहतोय

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात काल दि. १२ रविवार रोजी दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मनुदेवीच्या मंदिरासमोर असलेला धबधबा दोन ते तीन तास ओसंडून वाहतोय. परिसरात झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून परीसरात शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.

मनुदेवीच्या मंदिर परिसरात विजांच्या कडकडाटासह सुमारे दोन ते तीन तास मुसळधार पाऊस झाला. मनुदेवी मंदिर परिसरात असलेले भाविक काही वेळ सातपुड्याच्या परिसरात असलेल्या नदीनाल्यांना पूर आल्याने मंदिर परिसरात थांबुन होते. भाविकांना काहीवेळ मनुदेवी मंदिरात थांबविण्यात आले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पाणी कमी झाल्यानंतर  मंदिर परिसरात अडकलेले दुकानदार व कर्मचारी व भाविकांना मंदिरातील कर्मचाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले.

सातपुडा परीसरात झालेल्या या पावसाचे पाणी तलावात जमा झाल्याने वन्यजीव प्राण्यांचीही पाण्याची सोय झाली आहे. जुन महिन्यात प्रथमच मनुदेवीचा धबधबा कोसळल्याने मंदिर परिसरात नदीनाल्यामध्ये भाविकांनी टाकलेला  कचरा ही वाहून गेल्याने मंदिर परीसर स्वच्छ झाला आहे. परीसरात गारवा निर्माण झाला असुन सातपुडा या पावसामुळे हिरवाईने नटणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.