खळबळजनक : नंदुरबार जिल्ह्यात आहार सेवेत अपहार न्यायालयाचे आदेश असूनही कारवाईत दिरंगाईचा आरोप

0

 

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क;

नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या आहार सेवेत अपहार झाल्याचे चौकशी अहवालात उघड झाले असून मा. उच्च न्यायालयाने चार महिन्यापूर्वी कारवाईचे आदेश देऊनही कारवाईत दिरंगाई का होतं आहे. उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांच्या कार्यशैलीवर संशय निर्माण होतं आहे, नाशिक मंडळात सुरु असलेल्या आहार सेवा पुरवठा बाबत सदर संस्थे सोबत उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांचे काही हित संबंध आहेत. कि, आर्थिक संबंध आहेत. याची चौकशी व्हावी व चौकशी होईपर्यंत डॉ. भोये यांचा उपसंचालक यांचा पदभार काढून घ्यावा. अशी मागणी करत भरत देशमुख यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत भोये यांच्यावर आरोप केले आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्ण व एका नातेवाईकांस आहार सेवा पुरवठा करण्याचे कंत्राट श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयं रोजगार सहकारी संस्था नाशिक यांचे असून या आहार सेवेत नंदुरबारचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्या कार्यकाळात अपहार झाल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालात उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते भरत नामदेव देशमुख यांनी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात याचिका क्र.१३२६२/२०२१ दाखल केली होती. याचिकेच्या माध्यमातून कारवाईची मागणी करण्यात आली होती, याचिकाकर्ते यांची मागणी मा. न्यायालयाने मान्य करून संबंधित आरोग्य यंत्रणेला कारवाईचे आदेश दिनांक.१८ एप्रिल २०२२ रोजी देऊनही अद्याप सदर संस्थेवर ठोस कारवाई झालेली नाही. मा. उच्च न्यायालयच्या आदेशाला देखील हे अधिकारी जुमानत नाहीत असंच यातून दिसून येत आहे. आहार सेवेच्या कंत्राटदार संस्थेला पाठीशी घालण्याकरिता डॉ. भोये अजून काय काय करतील कुणास ठाऊक? असं देशमुख म्हणाले.

आहार सेवा कंत्राटदार संस्थेवर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी.

नंदुरबार जिल्ह्यातील आहार सेवेत अपहार झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट असतांना खोटे देयकांच्या आधारावर जास्तीचे देयके शासनाकडून घेतल्याचे निष्पन्न झाल्यावर देखील, शासनाची आर्थिक फसवणूक झाली असतांना संस्थे विरुद्ध गुन्हा का दाखल होतं नाही याचे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे तक्रार करणार

तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोये यांच्या कार्यकाळातील हा अपहार आहे आणि आता तेच उपसंचालक नाशिक पदभार सांभाळत आहेत यामुळे त्यांना इथं कारवाई करणं शक्य होतं नसावं, स्वतःच… स्वतःवर कारवाई कशी करणार, आरोग्य विभागाचे अधिकारी कारवाई करण्याच्या मानसिकतेत नसल्याने आम्ही आता थेट मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे डॉ. भोये यांना उपसंचालक पदावरून हटविण्यासाठी मागणी करून पाठपुरावा करणार आहोत. न्याय न मिळाल्यास पुन्हा मा. उच्च न्यायालयात जाणार आहे. न्याय मिळेपर्यंत कायदेशीर लढा सुरूच राहील असं भरत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.