शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात नोटा बंदीला 5 वर्षे उलटली आहेत. ही बंदी आल्यानंतर पुढे बरेच दिवस जुन्या नोटा बदलूनही दिल्या गेल्या, तर शिर्डीवाल्या साईबाबांच्या दानपेटीत भाविक जुन्या (रद्द झालेल्या) नोटा टाकत असल्याचे समोर आले आहे.
बंद पडलेल्या या नोटा बदलून मिळण्याची मुदत कधीच उलटली आहे. याउपर स्वत:कडे या नोटा उरलेल्या आहेत म्हटल्यावर टाक साईबाबांच्या दानपेटीत असे चाललेले आहे. साईबाबा संस्थानकडे पाचशे आणि एक हजाराच्या नोटा मिळून असे तब्बल तीन कोटी रुपये साचले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, या नोटा बाळगणे म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. नोटा बाळगल्या तर गुन्हा दाखल होतो, फेकावे म्हटले तर मन ऐकत नाही… मग काय करावे म्हणून अशा मंडळींनी मंदिरांच्या दानपेट्यांचा मार्ग या नोटांच्या निचर्यासाठीच जणू निवडला आहे. नोटाही मार्गी लागतील, पदरात दानपुण्यही पडेल, असा होरा असलेली ही मंडळी खरे तर देवांनाही फसवायला निघाली आहे! दुसरीकडे, ‘श्रद्धा और सबुरी’ हा मंत्र देणार्या साई संस्थानच्या कुरबुरी यामुळे वाढल्या आहेत. साई संस्थान कोंडीत सापडले आहे.
देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटा बंदीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत बंद करण्यात आलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या या जुन्या नोटा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्वीकारण्यात आल्या किंवा बदलून देण्यात आल्या.
या काळात साई संस्थानने दररोज दानपेट्या उघडून पैशांची मोजदाद करून, जुन्या नोटा तातडीने राष्ट्रीयीकृत बँकेत जमा केल्या. 31 डिसेंबरनंतर बँकांनी जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले. मात्र, त्यानंतरही संस्थानच्या दानपेटीत या नोटा आढळतच गेल्या. तीन कोटींपुढे गेलेल्या जुन्या नोटांच्या आकड्यामुळे साई संस्थान त्रस्त आहे.
संस्थानचा रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरू असून, याबाबत संस्थानकडून अर्थ मंत्रालयाला पत्रही पाठविण्यात आलेले आहे. मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेलाच याबाबत काय तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.