तेलही गेले, तूपही गेले, शिंदेंच्या आमदाराच्या हाती धुपाटणे ?

भाजपच्या दाव्याने चिंता वाढवली

0

नागपूर, लोकशाही न्युज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. विदर्भात काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला घाम फोडला. विदर्भाचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. नागपूर ग्रामीणमधील सगळ्याच सगळ्या म्हणजे सहा जागांवर लढण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि शिंदे समर्थक आमदारांची धाकधूक वाढली आहे.

आशिष जैस्वाल 2019 मध्ये रामटेकमधून विजयी झाले. ते अपक्ष आमदार आहेत. एकनाथ शिंदेंशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. तर उमरेड मतदारसंघातून विजयी झालेल्या राजू पारवेंनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. पण काँग्रेस उमेदवाराच्या विजयामुळे त्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले आणि आता भाजपने त्यांच्या मतदारसंघात सुरु केलेल्या तयारीमुळे पुन्हा आमदार होण्याची शक्यता धोक्यात आली आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी उत्तम असल्याचे नागपूर ग्रामीणचे भाजप अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले. ‘महायुतीमधील अन्य घटक पक्षांपेक्षा भाजपचे प्राबल्य अधिक आहे. रामटेक, काम्पटी, काटोल, सावनेर, उमरेड, हिंगणात भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेव्हलवर काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे,’ असे कोहळे म्हणाले. रामटेक आणि उमरेड मतदारसंघांवर शिंदेसेनेने दावा केला. पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी दोन जागा शिवसेनेला मिळायला हव्यात अशी भूमिका मांडली. विद्यमान आमदारांच्या जागा आम्हाला मिळाव्यात, असे वाघमारे म्हणाले. पण भाजपने सहा जागांवर दावा सांगितला आहे. त्यात शिंदेसेनेच्या आमदारांच्या जागा देखील येतात.‘ज्याचा आमदार त्याची जागा हे सूत्र लक्षात घेतल्यास काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 2019 मध्ये जैस्वाल जिंकले असले तरी ते अपक्ष आमदार आहेत. पारवे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे दोघेही शिवसेनेचे आमदार नाहीत,’ असा तर्क भाजपचे पदाधिकारी कोहळेंनी दिला. जैस्वाल भाजपच्या तिकिटावर रामटेकमधून निवडणूक लढतील अशी चर्चा आहे.

 

अडचणीचा पेच

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिंदेसेनेत आलेले राजू पारवे मात्र मोठ्या अडचणीत आले आहेत. ते 2019 मध्ये उमरेडमधून विजयी झाले होते. ‘उमरेडची जागा कायम भाजप लढवत आला आहे. तिथे आमच्याकडे सुधीर पारवेंच्या रुपात मजबूत उमेदवार आहेत. ते 2019 मध्ये पराभूत झाले असले तरी मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे,’ असे कोहळे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.