निवडणुकीत मतदान केंद्र म्हणून शाळेची थातुरमातुर दुरुस्ती

शेंदुर्णी जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेची दैनावस्था

0

शेंदुर्णी या. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अतिशय जुनी असलेली जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेत सध्या विद्यार्थी नाही, शाळेची पडझड, शाळेत अनधिकृत इतरांचा बिनधास्त प्रवेश, वर्गांचे हाल व ग्रामस्थांचे दुर्लक्ष यामुळे सध्या शाळेची अवस्था म्हणजे कुणीही वाली नाही अशी परिस्थिती झाली आहे. सध्या शाळेची दुरुस्ती निवडणुकीत मतदान केंद्र असते म्हणुन सुरू आहे. या ठिकाणी मात्र थातुरमातुर काम होत असल्याने शाळेच्या अवस्था फार कठीण होणार आहे.

शतकोत्तर परंपरा असलेल्या या शाळेचं मोठं वैभव एकेकाळी होते. अनेक पिढ्यांनी या शाळेत आपले प्राथमिक शिक्षण घेतले आहे. आज मात्र शाळेची दुरावस्था एवढी झाली आहे की ग्रामस्थांना, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, पालक यांचं दुर्लक्ष यामुळे शाळेकडे बघायला सुद्धा कुणाला वेळ नाही. या शाळेची जुनी महत्वाची ठेव म्हणजे शाळेचे दाखले, शाळा सोडल्याचा दाखला असं असंख्य रजिस्टर गहाळ झाले आहे. चार रजिस्टर सुस्थितीत आहे तर चार पाच रजिस्टरचे पानंपानं झाले आहे. जातपडताडणी साठी हे दस्तऐवज महत्त्वाचे आहे. मात्र मुळ रजिस्टर गहाळ आहे, चोरी झाले आहे कुणाला काही माहिती नाही याची कुणीही जबाबदारी घेत नाही.

शाळेत कधीही कुणाचाही सहज प्रवेश

या शाळेत गेल्यावर हीच आपण शिकलो तीच शाळा आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो, ते एवढी दुरावस्था झाली आहे. वर्ग खोल्या नादुरुस्त, काही खोल्या पडक्या अवस्थेत आहे. पहिली ते चौथी वर्गात एकुण १५-२० विद्यार्थी शिक्षण घेतात, याच ठिकाणी अंगणवाडी भरते. एक दोन वर्ग खोल्या काही प्रमाणात बऱ्या आहे बाकीचे सगळं आलबेल आहे. शाळेला गेट सुद्धा नावालाच आहे. या शाळेत मुक्त प्रवेश कुणीही कधीही केव्हाही करतो. शाळेचा उपयोग दुर्दैवाने दारु पिणारे, प्रेम चाळे करणारे, पत्ता खेळणारे, डुकरं, कुत्रे, मुकी जनावरे अशांना हक्काचे ठिकाण ही शाळा झाली आहे. मुख्याध्यापक यांनी किती वेळा तक्रार अर्ज केले आहेत मात्र उपयोग काही होत नाही.

मतदानाचे केंद्र म्हणून होतेय दुरुस्ती 

सध्या या शाळेत मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी काही वर्गांची डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. जुने काही वर्ग खोल्यांचे पत्रे बदलविणे सुरू आहे तर काही ठिकाणी जुने आणि नविन पत्रे यांचा जांगडगुत्ता आहे. लाखों रुपये या वर्ग खोल्यांच्या दुरुस्ती साठी आले आहे. या पैशाचा पुरेपुर उपयोग शाळेची अवस्था बदलविण्याकरीता व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.