बापरे.. सीमा हैदरला 11 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही आगळ्या वेगळ्या प्रेमकहाण्या प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक प्रेमकहाणी सीमा हैदर आणि सचिन यांची चर्चेत आहे.  पब्जी गेम खेळताना ती पाकिस्तानी महिला प्रेमात पडली. नेपाळमार्गे भारतात आली. प्रियकर सचिन याच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यांच्या प्रेमाची देशभर चर्चा झाली. तिच्यावर पाकीस्तानी हेर असल्याचा आरोप देखील झाला. आता सीमा हैदर हिच्यासह पती सचिन आणि एका वकिलाला नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमधून सीमा हैदर हिच्याकडे तब्बल 11 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ? 

सीमा हैदर हिचा पाकिस्तानमधील पहिला पती गुलाम हैदर याने आपल्या वकिलामार्फत तिला नोटीस पाठविली आहे. हरियाणातील पानिपत येथील वकील मोमीन मलिक यांच्यामार्फत गुलाम हैदर याने सीमा हैदर, तिचा पती आणि मानलेला भाऊ यांना ही नोटीस पाठविली आहे. वकील मोमीन मलिक यांनी सीमा हैदर हिचा भाऊ वकील डॉ. ए. पी. सिंग यांना 5 कोटी तर, सीमा हैदर आणि तिचा भारतीय पती सचिन यांना प्रत्येकी 3 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठविली आहे. या तिघांनीही जाहीर माफी मागावी आणि दंडाची रक्कम महिनाभरात जमा करावी, अन्यथा तिघांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

मुलांचा धर्म कसा बदलला?

गुलाम हैदर यांचे वकील मोमीन मलिक यांनी या नोटीसमध्ये त्यांच्या अल्पवयीन मुलांचा धर्म कसा बदलला, अशी विचारणाही केली आहे. कायद्यानुसार जर एखाद्या मुलाचा धर्म बदलायचा असेल तर त्याला त्याची माहिती द्यावी लागते. यामध्ये मुलांच्या वडिलांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ही प्रक्रिया का पाळली गेली नाही? मुलांचा धर्म बदलताना वडिलांना का विचारले नाही अशी विचारणाही या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

हे लग्न अवैध ?

सीमा हैदर ही आपल्या चार मुलांसह भारतात आली होती. सीमा हैदर हिने सचिन याच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यानंतर तिने आपल्या मुलांचेही धर्मांतर केले. हे धर्मांतर चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी एक तर महिनाभरात माफी मागा अन्यथा सीमा, तिचा पती सचिन आणि वकील यांनी 11 कोटी रुपये द्यावेत . तसेच सीमा हैदर हिचा भारतीय पती सचिन याला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये सचिन याने सीमा हैदर हिला आमिष दाखवून भारतात बोलावले. सीमा हैदरने पती गुलाब हैदर यांच्याशी घटस्फोट न घेता सचिनसोबत दुसरे लग्न केले आहे. याला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे हे लग्न अवैध आहे असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.