‘शोले’ फेम अभिनेते बिरबल काळाच्या पडद्याआड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.  बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.

सतींदर यांची बिरबल या नावाने अवघ्या सिनेसृष्टीत ओळख होती. मुंबईतल्या एका रुग्णालयात काल (१२ सप्टेंबर) सायंकाळी सतींदर यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सतींदर यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी (१३ सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

सतींदर यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३८ रोजी पंजाबमध्ये झाला असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये विनोदी पात्र साकारले आहे. सतींदर यांनी फक्त पंजाबी भाषेतच अभिनय केला नाही तर, भोजपुरी, मराठीसह हिंदीमध्ये देखील अभिनय केला. १९६६ मध्ये ‘दो बंधन’ आणि १९६७ मध्ये मनोज कुमारच्या ‘उपकार’ चित्रपटातून सतींदर यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये करियरची सुरुवात केली. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयामध्ये आवड होती. शिक्षणाऐवजी सतींदर यांना भांगडाच्या कार्यक्रमध्ये आणि नाटकांमध्ये सर्वाधिक आवड होती. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दिमध्ये जवळपास ५०० हून जास्त अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

आजही सतींदर यांना चाहते ‘शोले’ चित्रपटामुळेच ओळखतात, शोलेमधल्या लूकमुळे त्यांची आजही चर्चा होते. ‘तपस्या’, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘चार्ली चॅप्लिन’, ‘अनुरोध’, ‘अमिर गरीब’, ‘सदमा’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘जुगारी’, ‘फिर कभी’, ‘मिस्टर अँड मिसेस’, ‘खिलाडी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सतींदर यांनी काम केले आहे. सतींदर यांनी मनोज कुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि मुमताज सारख्या बड्या सेलिब्रिटींसोबत सुद्धा त्यांनी काम केलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.