देशात सर्वाधिक समान संधी केंद्र राज्यात ! – डॉ. प्रशांत नारनवरे

0

जळगाव ;- देशामध्ये सर्वाधिक संख्येने समान संधी केंद्र सुरू करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम असून या समान संधी केंद्राच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव कार्यालयाच्या वतीने येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समान संधी केंद्राच्या समन्वयकासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक उपायुक्त श्री माधव वाघ, बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक, डॉ. भगवान वीर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव श्री वाय एस पाटील, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्री रवींद्र पाटील यांच्यासह नाशिक विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अदि मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालये व येणाऱ्या पिढीसाठी समान संधी केंद्र हे अत्यंत उपयुक्त माध्यम असून याद्वारे नवसमाज व नवराष्ट्र घडविण्यास निश्चित त्यातून मदत होणार आहे तसेच या केंद्राच्या माध्यमातून गुणवत्ता व कौशल्य पूर्ण शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी समाज कल्याण विभागाने समान संधी उपक्रम व्यापक स्तरावर राबविला असल्याचे डॉ नारनवरे यांनी सांगून राज्यातील एकूण २८ हजार महाविद्यालयांपैकी १५५०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक समान संधी केंद्र सुरू करण्यात राज्य अव्वल स्थानी असल्याचेही डॉ. प्रशांत नरनवरे यांनी यावेळी सांगितले.

जागतिकीकरणाच्या युगात प्रत्येक विषयात संधी असून त्यासाठी सर्वांनी विषय कौशल्य निर्माण करणे काळाची गरज असल्याचेही डॉ.प्रशांत नारनवरे यांनी शेवटी बोलताना सांगितले.समान कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री माधव वाघ यांनी प्रास्ताविकात समान संधी केंद्राचे महत्व स्पष्ट करताना सर्व महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी श्री रविंद्र पाटील यांनी देखील विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थी उपयोगी योजनांची यावेळी माहिती करून दिली.

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री वाय एस पाटील यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेला विद्यार्थ्यांना लाभाचे वाटप यावेळी करण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्रांचे देखील प्रतिनिधीत्व स्वरूपात वाटप करण्यात आले. तसेच समाज कल्याण नाशिक विभागाच्या सर्व जिल्ह्यांनी तयार केलेल्या यशोगाथा पुस्तिकेचे व विविध कार्य अहवालाचे यावे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सदर कार्यक्रमासविविध महाविद्यालयाचे प्राचार्य, समान संधी केंद्राचे समन्वय अधिकारी, विद्यापीठातील विभाग प्रमुख, समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave A Reply

Your email address will not be published.