प्रियकरासोबत तरुणीने रचला दरोडा आणि अपहरणाचा कट

0

साक्री पोलिसांनी केली दोन संशयितांना अटक

साक्री -शहरातील दौलत बंगल्यावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी तरुणीने स्वतःच अपहरण व दरोड्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. तरुणीला पळवून नेणे, त्यानंतर अचानक तिला टाकून आरोपी फरार होणे आणि लगेच ती घरी परत आल्याने संशय बळावला आणि पोलिसांनी कसून तपास केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने मुख्य आरोपीसह धुळ्यातील वाहन चालकाला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. संबंधित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर यात आणखी माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर आणखी ४ संशयितदेखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

येथील दहिवेल रस्त्यालगत सरस्वतीनगरात शनिवारी दि. २४ ज्योत्स्ना नीलेश पाटील यांच्या घरी रात्री साडे दहाच्या सुमारास काही दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. ज्योत्स्ना पाटील यांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सुमारे ८८ हजार ५०० किमतीचे दागिने हिसकावले. तसेच त्यांच्या २३ वर्षीय भाचीला घेऊन पाच ते सहा दरोडेखोर पसार झाले होते. दरोड्यासोबतच तरुणीच्या अपहरणामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिस शोधपथकाने घटनेच्या चौथ्या दिवशी दोन संशयितांना इंदूर (मध्य प्रदेश)जवळील एका गावातून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील इको कार व बोलेरो अशी दोन वाहनेदेखील ताब्यात घेतली आहे.विनोद भरत नाशिककर (वय ३८, गायत्रीनगर, शाजापूर, मध्यप्रदेश) व रोहित संजय गवळी (वय २२, मोगलाई, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली. यातील रोहित गवळी हा वाहनचालक आहे. तर विनोद नाशिककर हा सौरऊर्जेचा ठेकेदार असून तो अपहृत तरुणीचा प्रियकर आहे. दोघांनी पळून जाण्याच्या इराद्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कट रचल्याचे उघड झाले. अपहृत तरुणीच्या घराशेजारी संशयित विनोद नाशिककर हा पूर्वी राहत होता. तेव्हापासून या तरुणीशी त्याची ओळख होती.

शनिवारी दि. २५ रोजी दरोड्याच्या आधी विनोद व हरियाणातील ४ संशयित मजूर हे सेंधव्यात दुपारी एकत्र आले होते. त्यानंतर ते साक्रीत संध्याकाळी पोचले. संबंधित तरुणी हि विनोदच्या संपर्कात होती. रात्री साडेदहा वाजता संशयित विनोद व इतर पाच जणांनी तरुणीच्या आत्याच्या घरी दरोडा टाकला. तेथे ८८ हजार ५०० रुपयांचे सोने लुटून तरुणीचे हात बांधून तिचे अपहरण करून घेऊन गेले. तरुणी व तिच्या आत्याचे फोन रस्त्यात फेकून दिले. तर विनोदने वापरलेली छऱ्याची छोटी बंदूक देवास जवळ क्षिप्रा नदीत टाकून दिली. दरोडा टाकल्यावर धुळे जिल्ह्यातील रायपूरवाडी येथे पोचल्यावर संशयितांपैकी रोहित गवळी व इतर ४ संशयित हे इको कार घेऊन दुसऱ्या दिशेला तर विनोद व तरुणी हे मध्यप्रेदशकडे शाजापूरला गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.