साधनेत प्रगती करण्यासाठी श्रद्धाभाव नितांत आवश्यक – स्वामी ईश्वरानंद, ऋषिकेश

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

साधना करत असताना साधन कोणतेही असले तरी साधनेत श्रद्धा भाव नितांत आवश्यक आहे. आपला साधना मार्गावर, आपल्या गुरुवर आणि आपल्या इष्टावर पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय साधनेत प्रगती होणे, आपले ध्येय गाठणे अशक्यच आहे. गुरुकृपेसाठी गुरू प्रती श्रद्धा आणि आपल्या साधना मार्गावर आपल्या आराध्यावर श्रद्धा असली तर साधनेत प्रगती लवकर होते आणि आपले ध्येय लवकर प्राप्त करता येते. मंत्र जप करताना सुद्धा पूर्ण श्रद्धेने दृढ संकल्प करून मंत्रजाप केल्यास मंत्राने सुद्धा साधनेत सिद्धी प्राप्त करता येते. असे प्रतिपादन ऋषिकेश येथील स्वामी ईश्वरानंद यांनी जाहीर व्याख्यान प्रसंगी केले.
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी मध्ये २२ फेब्रुवारी रोजी ‘मंत्रयोग- वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित जाहीर व्याख्यान प्रसंगी स्वामी ईश्वरानंद बोलत होते. यावेळी त्यांनी साधना प्राप्त झालेली ऊर्जा उत्तम कार्यासाठी उपयोगात आणावी त्याचे प्रदर्शन करू नये. सिद्धीचे प्रदर्शन केल्याने त्या शक्तीहीन होतात आणि साधना मार्गातील अंतिम ध्येय प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करतात असा उपदेशही त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला. मंत्र सिद्ध करण्यासाठी गुरुवर श्रद्धा आणि गुरुकृपा आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्वामी ईश्वरानंद ऋषिकेश येथील योगा धरणेंद्र गुरुकुलम चॅरिटेबल सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेद्वारा ते मुलांना सुसंस्कारी करून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने निस्वार्थ सेवा देत आहेत.
कार्यक्रम प्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, सोहम चे संचालक डॉ. देवानंद सोनार उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे, के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शीतल पाटील यांनी केले तर आभार प्रा. पंकज खाजबागे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्योती वाघ, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, यांचे सहकार्य लाभले. योगशिक्षक पदविका, एम. ए. योगिक सायन्स आणि नॅचरोपॅथी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन आणि ऑनलाइन उपस्थिती दर्शविली.

Leave A Reply

Your email address will not be published.