परिवहन विभागाच्या १४ फेसलेस सेवा नागरीकांना घरबसल्या मिळणार

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र शासनाने परिवहन विभागाच्या एकूण 58 सेवा फेसलेस पध्दतीने नागरिकांना देणेबाबत निर्देश दिले आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव कार्यालयात एकूण 14 फेसलेस सेवा कार्यान्वीत झाल्या असल्याची माहिती श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

वाहन 4.0 संगणकीय प्रणालीवरील देण्यात येत असलेल्या फेसलेस सेवा – डिलर पॉईट नोंदणी, ना-हरकत प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्रामधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, तात्पुरती वाहन नोंदणी सेवा, वाहनावरील कर्ज बोजा रद्द करणे, वाहन मालकीचे हस्तांतरण या सात सेवा देण्यात येत आहेत. तर सारथी 4.0 संगणकीय प्रणालीवरील देण्यात येत असलेल्या फेसलेस सेवा- शिकाउ अनुज्ञप्ती, वाहन चालक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहन चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे या सात सेवा देण्यात येत आहे.

या वाहन विषयक फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी www.Parivahan.gov.in या संकेत स्थळावर भेट देवून ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी क्लिक करून वाहन संबंधित सेवा हा पर्याय निवडावा. तर सारथी विषयक फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी www.Parivahan.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी क्लिक करून अनुज्ञप्ती संबंधित सेवा हा पर्याय निवडावा. या फेसलेस सेवांसाठी आता नागरिकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. या सेवांचा नागरिकांनी घरबसल्या संगणक/मोबाईलचा वापर करून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. लोही यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.