लोकशाही न्युज नेटवर्क
भुसावळ ; आठ लाखाचा ऐवज लंपास. दिवसा अपार्टमेंटमधील घरातून आठ लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ शहरात घडला आहे.
रघुनाथ चुडामण चौधरी हे शिवपूर कन्हाळा रोडवरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंटमध्ये राहतात ते आपल्या कुटुंबियांसह शनिवारी श्री क्षेत्र शिरसाळा येथे दर्शनासाठी गेले होते. केवळ कुटुंबातील मोठी सून घरी होती. त्या देखील दरवाजाला कुलूप लावून शेजारील – नातेवाइकांकडे गेल्या होत्या.
दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान अपार्टमेंट जवळ पांढर्या रंगाची कार मधून तीन जण खाली उतरले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील चौधरी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील २ लाखांची रोकड, १३ ग्रॅमचे प्रत्येकी दोन नेकलेस, अंगठ्या, लहान मुलांचे दागिने, कानातले टॉप्स असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल लांबवला.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय हरीष भोय यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे.