भुसावळचे नागरिक गढूळ पाण्यामुळे त्रस्त

0

रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळचे नाव भारतभरात प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा भुसावळ शहरातून जातो. जिल्ह्यातील एक प्रमुख नदी तापी नदीच्या किनाऱ्यावर भुसावळ शहर वसलेले आहे. अगदी भुसावळ शहरालगतच विद्युत निर्मितीचे दिपनगर थर्मल पावर स्टेशन आहे. रेल्वे वाहतूक रस्त्यांची वाहतूक तसेच वीज आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असून अडीच लाख लोकसंख्या असलेल्या भुसावळ शहराची कोणत्याच अर्थाने प्रगती झालेली नाही. उद्योग धंदे वाढीसाठी सुविधा असताना उद्योगधंदे नाहीत. एमआयडीसी विकसित झालेली नाही. सध्या पावसाळा असून तापी नदी भरून वाहतेय. ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ म्हणतात तशी भुसावळची अवस्था झालेली आहे. दहा ते बारा दिवसानंतर भुसावळ शहरात नळाला पाणी मिळते. जे पाणी नळाला येते ते सुद्धा पिण्यालायक नाही. गढूळ व अस्वच्छ पाण्यामुळे भुसावळकर नागरिक त्रस्त झालेले आहेत. नाशिक विभागातील अ वर्गात असलेली भुसावळ ही एकमेव नगरपालिका आहे. गेल्या दीड वर्षापासून भुसावळ पालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. नगरपालिकेतर्फे होणाऱ्या अस्वच्छ गढूळ पाण्यासंदर्भात भुसावळचे नागरिक तक्रारी करून थकले. त्यातही येणाऱ्या गढूळ पाण्यासाठी दहा ते बारा दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. विशेष म्हणजे पोटाच्या विकारांनी भुसावळकर ग्रस्त आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी नंतर भुसावळचे आमदार संजय सावकार यांनी काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या आणि पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांची गढूळ पाणीपुरवठा संदर्भात आढावा बैठक घेतली. अधिकाऱ्यांसमवेत भुसावळ शहरातील होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या समावेत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर आणि पाणीपुरवठ्याची पाहणी केल्यानंतर दहा दिवसात भुसावळच्या प्रत्येक घरात नळाला आरओचे स्वच्छ पाणी मिळेल, असे जाहीर केले. परंतु आता वीस दिवस झाले तरी भुसावळकरांना पिण्याचे पाणी गढूळच मिळतेय. भुसावळ पालिकेवर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी जितेंद्र पाटील हे पालिकेचा कारभार पाहतात. मुख्याधिकारी महेश वाघमोडे प्रशासकांच्या मदतीला आहेत. भुसावळ शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या तापी नदीवर उभारण्यात आलेला फिल्टर प्लांट कालबाह्य झालेला असल्याने गढूळ पाणी त्यातून येते. तसेच या फिल्टर प्लांटच्या क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा लोंढा येत असल्याने पाणीपुरवठा उशिराने म्हणजेच दहा ते बारा दिवसांनी होतो, अशी वस्तुस्थिती असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येते. त्या फिल्टर प्लांटच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या ठेकेदाराकडून योग्य ते काम झाले नसल्याने पाच कोटी रुपये पाण्यात गेले. त्याच्याच बाजूला नवीन फिल्टर प्लांट उभारले जात आहे. त्यासाठी आमदार निधीतून दोन कोटी रुपये आमदार संजय सावकारे देणार, असे सांगत असले तरी त्या फिल्टर प्लांटचे कामही रखडले असल्याने ते कार्यरत नाही. सहा सात वर्षांपूर्वी अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी 90 कोटी रुपयांचा ठेका दिला गेला; परंतु तेही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. केव्हा पूर्ण होईल याची शाश्वती नाही. अमृत योजना पूर्ण झाल्यावर भुसावळकरांना शेळगाव मॅरेज मधून पाणीपुरवठा होईल. तोपर्यंत भुसावळ करण्यात गढूळ पाणीच मिळेल एवढे मात्र निश्चित…

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे सर्वात महत्त्वाचे शहर असून जळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. सर्व सुखसोईंची उपलब्धता असताना भुसावळ शहराची दुरावस्था का झाली? हे मात्र कळत नाही. रस्ते, पाणी, गटारी, वीज, स्वच्छता या सर्व बाबतीत भुसावळचे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील एकही रस्ता चांगला नाही. रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. पिण्याचे पाणी गढूळ आणि दहा ते बारा दिवसांनी मिळते. गटारी अपूर्ण असून तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर येते. स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत. अनेक भागात विजेअभावी अंधार आहे. किमान नागरी सुविधा मिळायला पाहिजेत, त्या मिळत नाहीत. भुसावळचे आमदार संजय सावकारे शहरातच राहत असताना सुद्धा भुसावळ शहराची दयनीय अवस्था झालेली आहे. त्याला जबाबदार कोण? गेल्या वर्षभरापासून आमदार संजय सहकारी भुसावळचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधी भुसावळ शहर आणि तालुक्यात विकासाचे कोणतेही ठोस प्रकल्प आलेले नाहीत. त्यामुळे जनता त्रस्त आहेत. किमान स्वच्छ पिण्याचे पाणी भुसावळकरांना मिळण्यासाठी काहीतरी युद्ध पातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा भुसावळची जनता क्षमा करणार नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.