राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! मला जाब विचारणारे हे कोण?

0

एकनाथराव खडसेंनी घेतला समाचार

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली नसून वैद्यकीय कारणास्तव मला लांब रहावे लागत आहे. मी शरद पवारांसोबत कायम आहे, मी कुठलाही दगाफटका केला नसून आमदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; मला जाब विचारणारे डॉ. सतिष पाटील व संजय पवार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी विरोधकांचा पत्रपरिषदेत समाचार घेतला. यावेळी अशोक लाडवंजारी, दीपक फालक व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. खडसे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय कारण असल्याने आपण निवडणूक लढविणार नाही हे सांगत आलो आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही याबाबत माहिती दिली असतांना डॉ. सतिष पाटील म्हणतात की, मी माघार घेतली हे पूर्णत: चुकीचे आहे. डॉ. सतिष पाटील यांनी अभ्यास न करता हे आरोप केले असून त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार हे पक्षफुटीनंतर शरद पवारांची साथ सोडून गेले. ते मला विचारणारे कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हेच संजय पवार माझ्या भरवश्यावर बँकेच विजयी झाले होते. स्वत:च्या घरात विविध पक्षांच्या माध्यमातून त्यांनी पदांची खिरापत वाटली आहे. स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून अशी त्यांची अवस्था आहे.

तुतारीच वाजविणारच!
भाजपाने स्नुषा रक्षातार्इ खडसे यांना उमेदवारी दिली असली तरी मी पक्षासोबत कायम राहून राष्ट्रवादीची तुतारीच आगामी निवडणुकीत फुंकणार असल्याचे श्री. खडसे यांनी सांगितले. आपण पक्षासोबत कायम असून शरद पवार यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही श्री. खडसे यांनी नमूद केले.

दोन दिवसात राष्ट्रवादीचा उमेदवार
रावेर लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. पूर्वीचे काही नावे मागे पडली असून नव्याने काही नावे चर्चेत आली आहेत. त्यात माजी आमदार संतोष चौधरी, मुक्तार्इनगरचे विनोद सोनवणे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. येत्या दोन दिसवात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरणार असल्याचेही श्री. खडसे यांनी सांगितले.

झुकलो नाही…झुकणारही नाही
भाजपाला रामराम केल्यानंतर आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला असून पक्षाशी एकनिष्ठ आहे. माझ्या घरात भाजपाने उमेदवारी दिली असली तरी मी राष्ट्रवादीचाच प्रचार करणार आहे. मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या प्रकरणात अडकविण्याचा प्रकार झाला मात्र मी सत्तेसाठी कधीही झुकलो नाही आणि झुकणार देखील नाही असे सांगत श्री. खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.