अवकाळी पावसाचे संकट; बळीराजाची वाढली चिंता

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आता पुन्हा पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या हिवाळा सुरू असताना अचानक पडलेल्या पावसाचा हवामानावर लगेचच परिणाम होताना दिसतो आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची लाट सुरू होती. त्यातच पावसाचे आगमन झाल्यावर थंडीत भर पडली होती. पावसाळ्यात मुसळधार कोसळून पावसाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता रब्बीचा हंगामदेखील पावसामुळे धोक्यात येतो काय याची चिंता शेतकऱ्याला आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यात पाऊस

राज्याच्या विविध भागात पुढील ३ दिवसात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. यात पुणे, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे काही जिल्हे आहेत. पुढील दोन तीन दिवसात राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पहिल्या दिवशी या ११ जिल्ह्यांमध्ये तर रविवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पाऊस पडू शकतो. या सर्व हवामानामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे.

बळीराजाची चिंता वाढली

उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण या विभागात पावसाची हजेरी लागणार आहे. मात्र राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाच्या चिंतेने ग्रासले आहे. मुसळधार पावसामुळे खरीपाचे चांगले आलेले पीक हातून गेल्याने निराश झालेला शेतकरी आता रब्बीच्या हंगामाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र सध्या पडत असलेल्या पावसामुळे आणि पुढील दिवसांमध्ये असलेल्या पावसाच्या शक्यतेमुळे रब्बीचा हंगामदेखील हातचा जातो की काय अशी भीती बळीराजाला सतावते आहे. त्यात थंडी आणि पाऊस असा सतत बदल होत असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्येलादेखील तोंड द्यावे लागते आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.