शरद पवार दहा जागा लढवणाऱ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष !

मंत्री राधाकृष्ण विखेंनी डिवचले

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजपचे स्टार प्रचारक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात समान नागरी कायद्यावर मोठे भाष्य केले. देशात समान नागरी कायद्याची नागरिकांची मागणी आहे. यासाठी 13 तारखेला मतदान करून त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे आवाहन मंत्री विखेंनी केले. शरद पवार दहा जागा लढवणाऱ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षच शिल्लक राहिला नसल्याची टीकाही मंत्री विखे यांनी केली आहे.

भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा गाडा ओढताना दिसत आहे. मंत्री विखे यांनी निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पायाला भिंगरी लावली आहे. दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख शहरांमध्ये स्वत: हजेरी लावत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंत्री विखेंचे पुत्र खासदार सुजय विखे दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार आहे. हा मतदारसंघ मंत्री विखे यांनी पिंजून काढत आहेत. महायुतीतील सर्व पक्षांना बरोबर घेण्याची कसरत विखे पिता-पुत्र साधत आहेत. मंत्री विखे यांनी अहमदनगर कँटोन्मेंट परिसरातील भिंगार शहरातील सभेत समान नागरी कायद्यावर मोठे भाष्य केले.  मंत्री विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून देशाच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधक टार्गेट करताना दिसत आहेत. शरद पवार लोकसभेच्या दहा जागा लढवणार्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षच नाही. ही मंडळी देशाला स्थिरता देऊ शकत नाही.

मोदींच्या हाती सत्ता दिली, म्हणजे देश सुरक्षित राहील. समान नागरी कायदा करण्यासाठी देशातील नागरिकांची मागणी असून, येत्या 13 तारखेला शिक्कामोर्तब करायचे आहे. देशात आपलेच सरकार येणार आहे. प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. खासदार सुजय विखे यांना मतदान करणारे हिंदुत्वाला आणि नरेंद्र मोदी यांना असेल. लोकसभेची निवडणूक ही महापालिका, कँटोन्मेंटची नसून देशाची सुरक्षा कोणाच्या हाती द्यायची आहे याची आहे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.