पुणे अपघाताने संताप, दादा का आहात नाराज ?

पालकमंत्री परत या : संभाजी ब्रिगेडची साद

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रविवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये झालेल्या अपघाताने एकूणच देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने रविवारी मध्यरात्री कल्याणीनगर येथे अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या तरुणांना आपल्या भरधाव वेगात असलेल्या कारने उडवले. यामध्ये अश्विनीचा जागीच मृत्यू झाला तर अनिशला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर पुण्यात आणि देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडवले जात असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र गायब आहेत. हा अपघात झाल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे देखील हजर झाले होते. यावरून सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र सुनील टिंगरे यांनी हा आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचे म्हणत सर्व आरोप खोडून काढले आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यतत्पर्तने प्रशासनाला हादरवून सोडण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत, असे असताना या प्रकरणात अजित पवार हे पुण्यात फिरकले देखील नसल्याने आता थेट पालकमंत्र्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सामान्य पुणेकर रस्त्यावर येऊन श्रीमंतासाठी वेगळा न्याय आणि गरिबासाठी वेगळा न्याय आहे का असं विचारत असताना आणि एकूणच पुण्यात संतापाची प्रचंड लाट उसळली असतात पालकमंत्री पुण्याकडे फिरकले देखील का नाहीत? हा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडकडून देखील अजित पवारांना हाच सवाल केला आहे. ‘पालकमंत्री महोदय, का नाराज आहात? जिथे असाल तिथून परत या? पुण्यात एवढी अपघाताची गंभीर घटना घडवून सुद्धा पुण्याचे पालकमंत्री कुठे गायब आहेत? पुणेकरांचा जीव? पुण्याची प्रतिष्ठा? महाराष्ट्राची इज्जत? ही पालकमंत्र्यांना महत्त्वाची वाटत नाही का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन जातात. पोलिसांना आदेश देतात? पालकमंत्री मात्र गायब आहेत? मत मागण्यासाठी आले आणि संकट काळात एकट सोडून गेले. पुणे कार एक्सीडेंट प्रकरण भयंकर असताना सुद्धा अजून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे! परंतु कोणीही चकार शब्द काढत नाही. पालकमंत्री नाराज असतील तर त्यांनी सांगावे. अजून काय राजकीय वेगळा निर्णय घ्यायचा असेल तो घ्यावा? परंतु पुण्यात परत यावे.’ असा टोला संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी लगावला आहे.

 

सीसीटीव्ही फुटेजचा आधार

दरम्यान, अल्पवयीन आरोपी हा कोझी रेस्टॉरंट आणि ब्लॅक क्लबमध्ये गेला होता. तिथून परतत असताना त्याने पोर्शे कार भरधाव वेगात पळवली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून सध्या या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपीचे घर ते कोझी रेस्टॉरंट, ब्लॅक क्लब ते अपघातस्थळ या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.