कटकारस्थान करण्याची सवय भाजपची !

गजानन कीर्तिकरांचे प्रत्युत्तर : वाद चिघळण्याची चिन्हे अधिक

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

‘कटकारस्थान करणे मला जमत नाही, ती सवय भाजपची आहे,’ असे सांगून खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपने केलेल्या आरोपांना गुरुवारी प्रत्युत्तर दिले. कीर्तिकरांच्या या नव्या वक्तव्यामुळे आता भाजपचे नेतेही आक्रमक होऊन वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. ‘खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपल्याशी संपर्क साधत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्याबाबत पुढील निर्णय पक्ष घेईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वायव्य मुंबई मतदारसंघाचे मावळते खासदार आणि शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कीर्तीकर यांच्यावर आरोप केला होता.

‘अमोल कीर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता, हा माझा जाहीर आरोप आहे. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तीकरांसमोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील आणि दुसरा कोणीही उमेदवार नसेल आणि नंतर गजानन कीर्तीकर उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि आपल्या मुलाला बिनविरोध खासदार निवडून आणायचे, हा गजानन कीर्तीकरांचा पूर्वनियोजित कट होता,’ असा माझा आरोप असल्याचे दरेकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आता गजानन कीर्तीकर यांनी दरेकरांच्या या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले. ‘भाजपचे नेतेच कटकारस्थानी असून, दुसऱ्यावर आरोप करतात. त्यामुळे त्यांची डोकी तशीच चालतात. कट करणे हे माझ्या रक्तात नाही. अमोलने निवडणूक लढविणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. अमोल हा शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. माझे निवृत्तीचे वय झाल्याने व मुलाविरोधात लढणे उचित नसल्याने मीही लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते,’ असे कीर्तिकर यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळेल आणि आपला मुलगा नगरसेवक, आमदार नव्हे तर थेट खासदार होईल, असे पक्षविरोधी विधान केल्याप्रकरणी खासदार गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केली आहे. तसे पत्रदेखील त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.