लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे; सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यभरत बैलगाडा शर्यती होत आहेत. आज आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीच्या घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत आज या बैलगाडा शर्यतीला प्रारंभ करण्यात आला. अनेक वर्षांनी बैलगाडा शर्यती होत असल्याने बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत झाली नव्हती. आज ज्या लांडेवाडीच्या घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, तिथे आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. पुणे जिल्ह्यात प्रथमच शर्यत पार पडत आहे. या शर्यतीसाठी जवळपास 800 बैलगाड्यांची नोंदणी झाली आहे. या शर्यतीची अंतिम फेरी उद्या पार पडणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल आहे.
उद्या मावळ तालुक्यात देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तिथे 350 बैलगाडा शर्यतीची नोंद झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही अटी आणि शर्थी दिल्या आहेत, त्याचे पालन करणे गरजेचे आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा शर्यती प्रेमींमध्ये नाराजीचा सुर पसरला होता.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर 16 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती.
या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे काही ठिकाणी या शर्यती घेण्यात येत नव्हत्या. अखेर या शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे.