PUBG गेमचा नाद..अल्पवयीन मुलांची घर मालकाला मारहाण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुणे 

मंचर : पब्जी गेमच्या नादातून अल्पवयीन मुलांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने घर मालकाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना. ही घटना आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे घडली. घर मालक व नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन अल्पवयीन मुलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या मुलांच्या दुचाकीमध्ये दोन कटर, मिरची पूड, हॅन्ड ग्लोज व बॅट सापडली आहे. याप्रकरणी मंचर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

पारगाव येथील कुंडीलक खंडू लोंढे यांच्या घरी सोमवारी (दि १४) सकाळी ११.३० च्या सुमारास दोन अल्पवयीन मुले हातात क्रिकेटची बॅट घेऊन आली. आम्ही येथे क्रिकेट खेळायला आलो होतो. तहान लागली आम्हाला पाणी मिळेल का? असे ते म्हणाले, लोंढे हे आपल्या आईशी फोनवर बोलत होते.

फोनवर बोलता बोलता त्यांनी घरातून दोन मुलांना पाणी आणून दिले. पाणी आणून दिल्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर दोन मुलांपैकी एकाने लोंढे मागे वळलेले असता हातातली बॅट लोंढे यांना मारण्यासाठी उगारली. लोंढे यांच्या ते लक्षात आले असता त्यांनी चुकवण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांच्या हाताच्या कोपरावर बॅट जोरात लागली. हा प्रयत्न फसल्याने मुलांनी पुन्हा एकदा हातातील बॅटने लोंढे यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅट दरवाजाच्या लोखंडी ग्रीलला लागली व लोंढे बचावले. त्या वेळेस लोंढे यांनी त्याला पकडले असता दोघेही खाली पडले. आपला प्लॅन फसला असल्याची खात्री होताच दोन्ही मुलांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

जवळच्या उसाच्या शेतात ते पळून गेले. मात्र लोंढे यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक तत्काळ धावतपळत आले. तरुणांनी उसाच्या शेतात मारेकरी मुलांचा शोध घेतला. दोन्ही मुलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोन्ही मुले ही १५ व १६ वर्षाचे असून यातील एकाचे वडील पोलीस खात्यात आहे तर दुसऱ्याचे आरोग्य खात्यात कार्यरत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. मौज मस्ती करण्यासाठी चोरीचा उद्देश असावा, असे असल्याची नागरिकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत होती.

घटना समजताच सहाय्यक पोलीस फौजदार कैलास कड, पोलीस जवान अजित पवार, होमगार्ड स्वप्नील जगदाळे, कमलेश चिखले यांनी तत्काळ पारगाव येथे जाऊन दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शहरातून येऊन या मुलांनी असे कृत्य केले आहे. दोन्ही मुले अल्पवयीन असून त्यांना पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे चौकशी करून पुढील निर्णय घेऊ असे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.