6 बंद्यांना 60 दिवसांची विशेष माफी, काय आहे कारण ?

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकारात 3 ऑक्टोबर, 2019 ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत 89 शिक्षा बंद्यांना 90 दिवसांची विशेष माफी मंजूर करण्यात आली आहे. तर विभागीय कारागृह उपमहानिरीक्षक यांचे अधिकारातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 6 बंद्यांना 60 दिवसांची विशेष माफी देण्यात आली आहे. असे जनसंपर्क अधिकारी, कारागृह मुख्यालय, पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील कारागृहातील बंद्यांचा शैक्षणिकस्तर उंचावणे तसेच बंद्यांमध्ये सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व यांची जाणीव विकसित व्हावी. याकरिता बंद्यांना शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे. तसेच जास्तीत जास्त बंद्यांनी या शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा व सहभाग नोंदवावा, याकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांचे संयुक्त उपक्रमानुसार कारागृहात अभ्यासकेंद्र व परीक्षाकेंद्र सन 2014 पासून सुरु करण्यात आले आहे.

कारागृहातील परीक्षा केंद्रातून दहावी/बारावी समकक्ष/पदविका/पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बंद्यांनी 10 वी, 12 वी समकक्ष/बी. ए./बी. कॉम/ एम. ए. इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेतलेल्या आहेत.

या उपक्रमाद्वारे बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन होऊन कारागृहातून मुक्त झाल्यावर सुशिक्षित नागरिक म्हणून समाजात चांगले जीवन जगण्यास प्रवृत्त होईल. स्वत: आर्थिक उत्पन्न मिळवून स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभा राहील व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घेऊ शकेल. शिक्षणाचे महत्व व शिक्षणाचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम या संकल्पनेने शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य करू शकेल अशी कारागृह प्रशासनाची धारणा आहे. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी कार्यालय, कारागृह मुख्यालय, पुणे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.