प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वर्ध्याचे तिघे जळगावात जेरबंद

0

जळगाव : आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यानंतर घरात घुसून सशस्त्र हल्ला करण्यासह तोडफोड करून जळगावात आलेल्या तिघांना शनिपेठ पोलिसांच्या मदतीने वर्धा पोलिसांनी अटक केली. हे तिघे मामे सासऱ्याकडे झोपलेले असतानाच सोमवारी पहाटेच्या सुमारास रोशन उर्फ बबलू नायडू (वय १९), कुणाल उत्तम चावरे (वय ३१) व ऋतिक बबलू नायडू (वय २५) सर्व रा. तारफैल पूलगाव, जि. वर्धा या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

वर्धा जिल्ह्यातील तारफैल पूलगाव येथे रोशन नायडू, कुणाल चावरे व ऋतिक नायडू यांचे गावातील काही जणांसोबत आर्थिकव्यवहारातून वाद झाले होते. त्यानंतर या तिघांनी चार दिवसांपूर्वी समोरील व्यक्तीच्या घरात घुसून शस्त्राने वार करण्यासह मारहाण करीत घरात तोडफोड केली होती. या प्रकरणी पूलगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर वरील तिघे तेथून पसार होवून ते जळगावातील त्यांच्या मामेसासऱ्यांकडे आले होते.

वर्धा पोलिसांचे पथक जळगावात आल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार परीष जाधव, पोहेकॉ अल्ताफ पठाण यांची मदत मागितली. दरम्यान, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वर्ध्यातील हल्लेखोर गुरुनानक नगरात अजय ढंढोरे यांच्याकडे थांबले आहे. त्यानुसार सोमवारी पहाटे तीन वाजता निंबाळकर, जाधव व पठाण हे तेथे पोहचले. तेथे तिघेही झोपलेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.