पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूल 15 महिन्यातच होणार ?

0

जळगाव शहराला जोडणारा शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम गेल्या 3 वर्षापासून सुरू असून त्याचे अद्याप काम 30 टक्के होणार असल्याने अजून 6 महिने हा पूल पूर्ण व्हायला लागणार आहे. अवघ्या दोन वर्षाच्या आत शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. अशी मुदत ठेकेदाराने दिली होती. तथापि हे काम तीन वर्षे झाली तरी अद्याप पुलाचे काम झालेले नाही. याबाबत अनेक प्रकारे चर्चा झाली. ठेकेदारावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. दोन वेळा 6-6 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत दोन वेळा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पायपीट करून संपूर्ण पुलाच्या कामाची पहाणी करून काम पूर्ण करण्याची सूचना दिली. परंतु पुलाचे बांधकामास विलंब होण्यामागे अनेक कारणांचा पाढा वाचला गेला. परंतु जळगाववासीय विशेषत: शिवाजीनगरचे 1 लाख नागरिक आणि या भागातील ग्रामीण परिसरातील लाखो जनतेला याचा त्रास होतोय त्यांची दखल कोणी घेत नाही. त्यांचा कोणी वालीच नाही असे म्हणता येईल.

दरम्यान 6 वर्षापूर्वी पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली होती. त्याच्या बांधकामाचा शुभारंभ लवकरच रेल्वे प्रशासनाच्या वतीने केला जाणार आणि हा पूल 18 महिने कालावधीत म्हणजे दिड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. महारेलच्या माध्यमातून या पुलाचे बांधकाम होणार आहे. 18 महिन्याची मुदत या पुलाच्या बांधकामासाठी देण्यात आले असले तरी 13 ते 15 महिन्याच्या कालावधीत या पुलाचे बांधकाम पूर्ण होईल असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एकूण 45 कोटी रूपयांपर्यंत या पुलाला बांधकामासाठी खर्च येणार आहे. 850 मिटरचा हा पूल होणार असून रेल्वे प्रशासनातर्फे ते 15 महिन्यात पूर्ण होणार आहे. तेव्हा शिवाजीनगर उड्डाण पूल आणि पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाच्या संदर्भात तुलना केली तर शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम कासव गतीने होण्याचे कारण काय? यात ठेकेदाराला एवढी सवलत कशासाठी दिली जातेय? शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या ठेकेदाराला एवढे मोठे 25 कोटीचा उड्डाण पूल करण्याचा अनुभव नसतांना या ठेकेदाराला हे दिले कसे गेले? या ठेकेदाराची निविदा मुंजरीत काही घोटाळा तर झाला नाही ना? असे अनेक प्रश्‍न विचारले जात आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी हा उड्डाण पूल बनवला जात असतांना एवढा प्रदिर्घ काळाचा विलंब कशासाठी? वगैरे प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे.

पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील वहातुकीची फार मोठी कोंडी सुटणार आहे. आज पिंप्राळा रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्यामुळे वहातुकीची फार मोठी कोंडी होते. म्हणून पिंप्राळा रेल्वे गेट विहीत वेळेत होणे अत्यंत आवश्‍यक आहे. या पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी लागणारी अर्धी रक्कम रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर महावितरणचे एका भागाचे पोल सुध्दा हटविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूल आणि शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची निश्‍चित तुलना होणार यात शंका नाही. शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे शिवाजीनगर आणि त्या भागातील ग्रामीण जनता तर परेशान होतेच आहे. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रहदारीच्या भागात वाहतुकीची कोंडी होतेय. या पुलाच्या रोडालगत असलेल्या व्यावसायिकांची तर 3 वर्षे झाली वाट लागली आहे. त्यांच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम झालेला आहे.

महानगरपालिकेला हे व्यापारी कर भरतात. कर भरल्यानंतर त्यांना सुखसोयी देणे महानगरपालिकेचे कर्तव्य नाही का? शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या दिरंगाईची आता गिनीज बुकात नोंद व्हायला हवी. या पुलाचे ठेकेदार श्रीश्री कन्स्ट्रक्शनचे यापूर्वी एवढी मोठी किंवा अशा प्रकारची कामे केल्याचा अनुभव नसतांना ही निविदा मंजूर कशी झाली त्यामागचे कारण शोधून निविदा मंजूर करणाऱ्या यंत्रणेला दोषी ठरवले पाहिजे. तरच यापुढे अशाप्रकारची दिरंगाई होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.