आरोग्यासाठी बहुगुणी पिंपळ

0

लोकशाही विशेष लेख

पिंपळ, वड, औदुंबर, शमी, बेल, चाफा, तुळस, पारिजात व रुद्राक्ष या झाडांना भारतात देववृक्ष म्हणून मान दिला जातो. कारण हे वृक्ष आरोग्यरक्षणाचे समाजोपयोगी कार्य शेकडो वर्षे करतात. या झाडाखाली अनेक योग्यांनी साधना केली आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमधील ‘विभूतियोग’ या दहाव्या अध्यायात वृक्षांमध्ये अश्वत्थ हा वृक्ष म्हणजे माझी विभूति आहे असे म्हटले आहे. या झाडाखाली बसून साधना करणाऱ्या सिद्धार्थ गौतमांना आत्मसाक्षात्कार झाला व खऱ्या ज्ञानाचा बोध झाला म्हणून त्या पिंपळाला ‘बोधिवृक्ष’ हे नाव दिले गेले. त्या गया नावाच्या बिहारमधील गावाला ‘बुद्ध गया’ असे म्हटले जाऊ लागले हा वृक्ष १०० फुटांपेक्षा जास्त उंच वाढतो. याचे खोड राखाडी रंगाचे ८-१० फूट जाडीचे होऊ शकते. पानांचा आकार हृदयासारखा दिसतो. ही पाने मध्यावर १०-१२ सें.मी. रुंद, देठ ६-१० सें.मी. लांब व निमुळते ४-५ सें.मी. लांबीचे टोक असते. ही पाने वारा आला नाही तरी सतत हलत असतात. म्हणून हिंदीत पिंपळाला ‘चलदल’ असे म्हणतात. पिंपळाची फळे सुमारे १-१.५ सें.मी. व्यासाची व लाल रंगाची असतात. ही झाडे पक्ष्यांच्या विष्ठेतून जन्माला येतात. त्यामुळे अशी उगवलेली झाडे, लहान असताना, मुळांसकट काढून लावली जातात.

गुणधर्म

१) तुरट रस, २) पचायला जड, ३) रूक्ष, ४) शीतवीर्य, ५) पित्तदोषनाशक, ६) कफदोषशामक, ७) कांतिवर्धक, ८) जखम लवकर भरून काढतो. ९) योनी शुद्ध करतो. १०) वेदनानाशक, ११) सूजनाशक, १२) पौष्टिक, १३) जंतुनाशक,
(बुरशी, बॅक्टेरिया इ.) १४) फळे १) हृद्य, २) दाहनाशक, ३) सूजनाशक. १५) साल उपयोगी म्हणून वाळवतात व वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवतात.

उपयुक्त भाग : १) खोडावरील आंतरसाल, २) पाने व ३) फळे.

आरोग्यासाठी फायदे

१) ओकारी- पिंपळाची बाह्यसाल लाकडासारखी सुकी असते. पण बाह्य सालीच्या आत आंतरसाल असते. ती ओली असते. ती काढून, तुकडे करून वाळवतात. ही सुकलेली साल जाळून राख करतात. एक चमचाभर राख पाण्यात टाकून ते पाणी प्यावे. याने ओकारी थांबते.

२) कावीळ- पिंपळाच्या पिकलेल्या पानाचे तुकडे करून विड्याच्या पानात घालून रोज दोन वेळा खायला देतात.

३) घोळणा फुटण – नाकाच्या आतील मण्यासारखा गोलाकार घोळणा शरीरातील उष्णता वाढल्याने फुटतो व त्यामुळे नाकातून रक्त वाहू लागते. अशा वेळी पिंपळाची ४-५ हिरवी पाने वाटून त्यांचा रस काढावा व प्रत्येक नाकपुडीत ५-५ थेंब घालावेत. त्यामुळे रक्त वाहणे लगेच थांबते.

४) जखमा- आंतरसालीचे तुकडे पाण्यात टाकून १० मिनिटे पाणी उकळावे. त्या पाण्याने जखम धुवावी व नंतर त्या जागी आंतरसाल वाळवून केलेले चूर्ण टाकावे. यामुळे वेदना थांबतात, जखम पुवळत नाही व लवकर भरून येते.

५) त्वचाविकार- ज्या वेळी आपल्या त्वचेला कंड/खाज येते. किंवा त्वचेला सूज येते, ती लाल होते. अशा त्वचाविकारांवर पुढील मलम लावावे.

मलम बनवण्याची कृती – पिंपळपूड एक चमचाभर घेऊन ती एक चमचा पातळ तुपात टाकतात. शिवाय त्यात गेरू (किंवा काव) ची वस्त्रगाळ पूड एक चमचा टाकून, व्यवस्थित मिसळून मलम बनते. ते मलम त्वचेवर कंड/सूज/लाली असेल त्या ठिकाणी लावावे, त्याचा लेप द्यावा. बरेच त्वचाविकार या मलमाने बरे होतात.

६) ताकद वाढविणे.
७) बुद्धिवर्धक.
८) तोतरेपणा घालवणे.
हा पारंपरिक उपचार वर दिलेले तीन फायदे मिळवण्यासाठी शेकडो वर्ष भारतीयांनी वापरला आहे. त्यासाठी कोवळी गुलाबी तळहाता एवढी लहान दोन पाने धुवून घेऊन त्यामध्ये, गरम मऊ भात त्यावर तूप घालून ठेवावा. नंतर हे मऊ भाताचे पिंपळपानासह बनणारे सैंडविच, मुलाला खायला द्यावे. हा उपचार महिनाभर तरी करावा लागतो. पण त्यामुळे १) मंदबुद्धीच्या मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी उपयोग होतो. २) अशक्त मुलांची ताकद वाढते. कारण पिंपळ पौष्टिक आहे. ३) जीभ जड असण्यामुळे मुलांना तोतरेपणा येतो, नीट बोलता येत नाही. हा दोषही कमी होतो/ नाहीसा होतो. नीट बोलता येते.

९) तोंड येणे – हा एक उष्णता विकार आहे. यासाठी पिंपळाची ओली आंतरसाल मधात उगाळून त्याचे चाटण करतात. पिंपळ उष्णताशामक असल्याने दिवसभरात दोन-तीन वेळा हे चाटण केल्याने फायदा होतो. तसेच दातांच्या तक्रारीतही फायदा होतो.

१०) दमा – पिंपळाच्या आंतरसालीचे वाळवून केलले चूर्ण एक चमचा घेऊन ते एक कप दुधात मिसळून ते रोज सकाळी अनशेपोटी प्यावे. हा उपचार २५-३० दिवस रोज एकदा, याप्रमाणे करावा लागतो. यामुळे दमा जातो.

११) पर्यावरणशुद्धी – या शंभर फुटांहून जास्त उंच वाढणाऱ्या डेरेदार वृक्षाला हजारो पाने असतात. ती सतत हलत असतात. त्याच वेळी हवेतील कर्बद्विप्राणिल वायू (Co,) शोषून घेतात. त्या पासून झाडाचे अन्न बनवतात व या क्रियेत तयार होणारा प्राणवायू हवेत सोडून देतात. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखालच्या परिसरात शुद्ध हवेचे प्रमाण जास्त असते. तेथून जाणाऱ्या वाटसरूंना जास्त प्राणवायू असलेल्या या हवेमुळे उत्साह येतो, तरतरी वाटते. म्हणून हजारो गावांमध्ये पिंपळाच्या झाडाखाली मोठे ओटे, पार बांधलेले आजही दिसतात. गावकीच्या सभा-बैठका या पारावरच होत असत. आजही हे दृश्य ग्रामीण भागात पाहायला मिळते.

१२) पाळी सुरू न होणे – काही मुली वयात आल्या तरी पाळी सुरू होत नाही. स्त्री-जीवनात ही गंभीर बाब आहे. अशा किशोरींना पिंपळाची आंतरसाल पाण्यात उकळून ते प्यायला द्यावे. रोज दोन वेळा प्यावे. आठ-दहा दिवसांत पाळी सुरू होते. नंतर उपचार बंद करावा.
१३) मधुमेह – काही विशिष्ट प्रकारांत मधुमेहीची लघवी निळसर रंगाची असते. अशा व्यक्तींला पिंपळाच्या सालीचा काढा द्यावा. २-३ इंच लांबीची आंतरसाल थोडीशी ठेचून पाण्यात टाकून १०-१५ मिनिटे उकळून गाळल्यास काढा मिळतो, तो वापरावा.

१४) योनी धावन – योनीतून पांढरा स्राव (श्वेतप्रदर) येत असेल, तर व/वा योनीची आग होत असेल तर वर दिल्याप्रमाणे (क्र. १३) आंतरसालीचा काढा करून, त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवून त्याने योनीमार्ग धुवावा व कापसाचा (बोळा) यालाच डुश म्हणतात. योनीमध्ये ठेवावा. त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते. समस्या दूर होते. यामुळे अपत्य व्हायलाही फायदा होऊ शकतो. म्हणूनही पिंपळवृक्ष पूज्य मानला गेला असावा.

१५) रक्तस्राव – पिंपळाची ४० ते ५० पाने वाटून त्यांच्या रसात, १ ते २ चमचे खडिसाखरेची पूड घालून प्यावे. याने मोठा रक्तस्रावही थांबतो बाहेरून पिंपळाच्या सालीचे चूर्ण जखमेवर टाकावे. याने जखम लवकर भरून निघते.

१६) शुक्रक्षीणता – पिंपळाचे मूळ, अंतर्साल/ खोड, चार पाने, फुले व फळे या पंचांगापैकी जेवढी अंगे उपलब्ध असतील यांचे चूर्ण करून दोन कप पाणी व एक कप दुधात टाकून १५-२० मिनिटे उकळवून त्यात थोडी खडिसाखर टाकून तो क्षीरपाक गाळून प्यावा. रोज एकदा याप्रमाणे हा क्षीरपाक कमीत कमी महिनाभर तरी घ्यावा लागतो. याने शुक्रवृद्धी होते.

१७) हृदयविकार – पिंपळाची अति कोवळी व अति जून पाने सोडून मधली पंधरा पाने घ्या. त्यांचे पुढचे निमुळते टोक व मागचा लांब देठ तोडून टाका. आता ती पाने स्वच्छ धुवा व त्यांचे तुकडे करून सुमारे ४०० मि. ली. (४ कप) पाण्यात टाकून १५-२० मिनिटे उकळवा. थोडे गार होईपर्यंत झाकण ठेवून पानांचा अर्क पाण्यात उतरू द्या. नंतर गाळून खाली येणारे पाणी दिवसातून तीन वेळा (प्रत्येक वेळी ३०-४० मि. लि.) औषध म्हणून प्यावे. हे सर्व महिनाभर रोज एकदा याप्रमाणे करावयाचे. यावेळात रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजेस दूर होतात. रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. परिणामी ऑपरेशन टाळता येते. पिंपळाच्या पानांचा हा उपचारही पारंपरिक आहे. अलीकडे डॉ. साने यांनी व्हॉटस् अॅपवर टाकल्याने सर्वत्र पसरला आहे. (डॉ. साने यांना धन्यवाद).

१८) हृदयदौर्बल्य – यासाठी पिंपळाच्या पिकलेल्या/ लाल झालेल्या दोन फळांचा एक कप पाण्यात काढा करून रोज एकदा प्यावा किंवा पिंपळाच्या आंतरसालीचा वा चूर्णाचा काढा रोज एकदा घ्यावा. फळे काही महिने मिळू शकतात, पण साल मात्र वर्षभर मिळू शकते. यामुळे हृदयाचे स्नायू बलवान होतात. अर्थात यासाठी तीन आठवडे हा उपचार करावा लागतो.

१९) जपान व पिंपळ – २००५ ते ०६ या काळात, ८-१० फूट उंच वाढलेली १०,००० झाडे जपानने भारतातून नेली. त्या सर्वांची तिथे लागवड केली. त्यांना १५ दिवस पाणी घालून जगवली इतके महत्त्व जपानने पिंपळाला दिले आहे. हे सर्व प्रत्यक्ष करणाऱ्या श्री. सोमणांनी ही घटना लेखकाला सांगितली आहे.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.