सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ.पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यापासून सातत्याने कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

मात्र दहा मार्चनंतर देखील काही दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. अखेर मंगळवारपासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली असून, आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दर प्रति लिटर 80 पैशांनी महाग झाले आहे.

चार नोव्हेंबर 2021 रोजी इंधनावरील कर कमी केल्याने देशात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर 21 मार्चपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या, अखेर मंगळवारी इंधनाच्या किमती वाढवण्यात आल्या. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 97.01 रुपये प्रति लिटर तर डिझेल 88.27 रुपये प्रति लिटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाच्या किमती

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये प्रति लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोल प्रती लिटर 102.78 तर डिझेल 95 रुपयांवर पोहोचले आहे. देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 111.03 रुपये लिटर तर डिझेल 93.83 रुपये लिटर आहे.

पुण्यात पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 110.67, 93.45 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर 108.43 तर डिझेल 88.08 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये डिझेल प्रति लिटर 94.15 तर पेट्रोल 111.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिक मध्ये एक लिटर पेट्रोल साठी 111.24 रुपये तर डिझेलसाठी 93.83 रुपये मोजावे लागत आहेत.

कच्च्या तेलाच्या दरात वाढ .दुसरीकडे आज कच्च्या तेलाच्या दरात देखील वाढ झाली असून, कच्चे तेल प्रति बॅरल 113 डॉलरवर पोहोचले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सारखा चढ-उतार पहायला मिळत आहे.

तीन आठवड्यांपूर्वी कच्चे तेल गेल्या चौदा वर्षातील सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र आता त्यात काही प्रमाणात घसरण झाली असून, आज कच्च्या तेलाचे दर 113 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.