पेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

पेण-  देशावर आलेल्या कोरोनाच्याP संकटातील अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच पेण मध्ये जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली 13 वर्ष मनोरंजनाचे रेलचेल असलेल्या पेण फेस्टिव्हलला जिल्ह्यातून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या पेण फेस्टिव्हलला रायगड जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी व्यक्त करत पेण फेस्टिवल उत्तरोत्तर प्रगती करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी महिलांसाठी झालेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात पौर्णिमा प्रधान यांनी पैठणी जिंकली.

स्वररंग पेणने आयोजित केलेल्या पेण फेस्टिव्हल 2021-22 चा शुभारंभ मोठया उत्साहात करण्यात आला. पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते व माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली कडू, स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, खजिनदार भारती साळवी, मनसे तालुका अध्यक्ष रुपेश पाटील, हिमांशू कोठारी, सारिका पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, सविता हांडे, अनिकेत साळवी, अनिरुध्द पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील जत्रेतून जसा आनंद मिळतो तसा आनंद या पेण फेस्टिवल मधून मिळत असून छोट्या व्यावसायिकांना तसेच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. मिस्टर रायगड, मिस रायगड, रॅम्प ऑक, फॅशन शोच्या माध्यमातून अनेकांचे भवितव्य घडले आहे. 13 वर्ष पेण फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करून सातत्य राखल्याबद्दल त्यांनी स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी यांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी सविता हांडे यांनी सादर केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा स्पर्धेत महिलांनी सुंदर खेळ सादर करून फेस्टिव्हलची शोभा वाढविली. या स्पर्धेत पौर्णिमा प्रधान यांनी प्रथम क्रमांक, दर्पणा पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर दीपा पित्रोडा यांनी तृतीय क्रमांक पटकावत पैठणी जिंकल्या. तर लकी ड्रॉ रुपाली वाणी यांनी जिंकला. सर्व विजेत्यांना निकिता साडीज कडून मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ भिडे तर आभार प्रदर्शन अक्षता साळवी यांनी केले.

स्वररंग पेण आयोजित, स्वररंग इंटरटेन्मेंट व साज मराठी मीडिया पार्टनरच्या समवेत नगरपालिका मैदानावर 12 दिवस रोज सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे फेस्टिव्हल भरविण्यात आले असून यामध्ये विविध खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, मनोरंजन साधने, महिलांसाठी शृंगारिक प्रसाधने, खेळांची साधने आदी दुकाने तसेच मनोरंजन कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष राजेंद्र साळवी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.