किल्ले दुर्ग भ्रमंती करत केरळचा तरुण पोहचला पारोळ्यात…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केरळचा हमरास एम.के. नावाच्या तरुणाने सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती वाचली आणि महाराजांच्या पराक्रमाने भारावून केरळमधील आपल्या छोट्याशा कोतापूरम जि.कालिकत(कोझिकोड) येथून तिरंगा अभियान यात्रा काढून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गडकिल्ले शिवतीर्थ परिक्रमा प्रारंभ केली. केरळमधील बेकील किल्ल्या नंतर कर्नाटकमार्गे १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनापासून सर्वप्रथम प्रतापगडाला नतमस्तक झाला. तेथून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांना तसेच ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो. त्यात प्रामुख्याने राजगड, तोरणा, पन्हाळा, माहुली गड, अजिंक्यतारा नंतर विदर्भातील सर्व किल्ले प्रवास करून मराठवाड्यातील किल्ल्यांना व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. देवगिरी किल्ला, अंतूर किल्ला भेट देवून खान्देशातील किल्ले व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी आज पाचोरा, भडगाव मार्गे पारोळा येथे पोहोचला.

कुठे ऊन तर कुठे पाऊस असा प्रवास करून पारोळा येथे आल्यावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ.शांताराम पाटील, सचिव प्रा.जे.बी.पाटील, जेष्ठ मार्गदर्शक पतंगराव पाटील, शहराध्यक्ष महेश पाटील, संदिप माने, मनोहर पाटील, देविदास पाटील तसेच अभय पाटील, संजय पाटील, प्रतिक मराठे यांनी हमरास एम.के.यांचे भुईकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रा.जे.बी.पाटील यांनी पारोळा किल्ल्याची माहिती दिली. हमरास यांनी सांगितले की महाराष्ट्रातील पारोळा येथील २३५ व्या किल्ल्याला भेट दिल्याचे सांगितले. तसेच ४९० ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. हमरास म्हणाले की महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाने जिंकलेल्या व बांधलेल्या स्वराज्यातील सर्व ३५० किल्ल्यांना भेटी देण्याचा संकल्प केला असून, इतिहास जाणून घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या जनजागृती बाबत जनतेने ठिकठिकाणी केलेल्या स्वागताने, आदरातिथ्याने दिलेल्या प्रेमाबद्दल व सहकार्याने भारावून गेलो. याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य शूरवीर आणि संतांची पुण्यपावन भूमी आहे. येथील संस्कृती व स्वागत कधीच विसरू शकत नाही, असे सांगितले. पण याच वेळी हमरास एम.के.यांनी गड दुर्गांवर असणारे प्लास्टिक पिशव्या, कचरा, घाण, वाढलेले गवत,  झुडपे, भिंतीवर लिहीलेले नावे, किल्ल्यांची झालेली दुरावस्था, पडझड व ढासळलेली तटबंदी, बुरुज हे पाहून वाईट वाटते, असे देखील सांगितले. या किल्ल्यांना नवसंजीवनी देणे, डागडुजी करणे, संवर्धन व जतन करणे आवश्यक आहे. स्वराज्यातील हे अतुलनीय शौर्याचे प्रतिक असलेले ऐतिहासिक किल्ले, स्थळे यांचे पावित्र्य जपणे हा पुढील पिढींसाठी प्रेरणादायी ठेवा असून सर्वांनी आत्मभान जागृत ठेवून जपणे गरजेचे आहे. प्रतापगडापासून आरंभ झालेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक दुर्ग प्रवास भ्रमंती आज जवळपास चौदा महिने ऊन,वारा, पावसाची तमा न बाळगता पुढील काळात अविरत सुरू ठेवून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या मोहिमेचा शेवट करणार असून जीवनाचे सार्थक होईल असे सांगून मायभूमी केरळमधील घरी परतेल असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास,गड किल्ले व ऐतिहासिक स्थळांची माहिती केरळमध्ये पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. या शिवप्रेमी युवकाचे साहस, सकारात्मक कार्य नक्कीच सर्वांना प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.