‘अपूर्णांक’ नाटकाचा पन्नासावा प्रयोग

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

परिवर्तन जळगाव निर्मित ‘अपूर्णांक’ या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता संभाजी नाट्यगृह येथे होणार आहे. परिवर्तन जळगाव ही प्रयोगाशील नाट्यसंस्था म्हणून राज्यभर व राज्याच्या बाहेर देखील ओळखली जाते. या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘अपूर्णांक’ या नाटकाने 50 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. खानदेशातील नाट्य चळवळ ही जुनी असली तरी संपूर्ण लांबीच्या कुठल्याही नाटकाचे 50 प्रयोग यापूर्वी झालेले नाहीत ही गोष्ट परिवर्तन जळगावच्या अपूर्णांक या नाटकाने करून दाखवली आहे.

हिंदी रंगभूमीवरील मोहन राकेश हे फार मोठे नाव व त्यांचं सगळ्यात जास्त गाजलेलं व भारतीय रंगभूमीवर अभिजात मानदंड मानले गेलेले ‘आधे अधुरे’ या नाटकाच मराठी रूपांतर शंभू पाटील यांनी केलं व परिवर्तन जळगावने याची निर्मिती केली. या नाटकाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांनी केले असून नेपथ्य मंगेश कुलकर्णी पार्श्वसंगित मिलिंद जंगम तर प्रकाशयोजना होरीलसिंग राजपूत यांची आहे. निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी व हर्षल पाटील आहेत. यामध्ये मंजुषा भिडे, प्रतीक्षा कल्पराज, राहुल निंबाळकर, मोना निंबाळकर व शंभू पाटील या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. या नाटकाच्या निर्मितीत अमरसिंह राजपूत यांची  मदत झाली आहे.

या नाटकाचे राज्यभर व राज्याबाहेर असे 49 प्रयोग यापूर्वी झालेले आहेत. आता सुवर्ण महोत्सवी प्रयोग परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेत दिनांक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. जळगावमध्ये निर्मित झालेल्या नाटकाचे 50 प्रयोग होतात ही जळगावच्या नाट्यसृष्टीसाठी आनंदाची गोष्ट आहे अशी भावना नाट्यकर्मी व नाट्य रसिक यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.