सातपुड्यातील वैजापूर वनक्षेत्रात पळस फुलला

0

लोकशाही विशेष 

पळस वृक्ष वनस्पती शास्त्रातील नाव-ब्युटिया मोनोस्पर्मा (butea Monosperma) कूळ-लेग्यूमिनोसे पेपिलिओनेसी (leguminosea papilionaceae). पळस हा पानझडी वृक्ष असून मध्यम आकाराचा 18 ते 40 मीटर उंचीपर्यंत वाढणारा व अति प्राचीन काळापासून सर्वांना परिचित आहे. याची अंगोपांग वापरण्यात येतात. पळस हा वृक्ष अत्यंत पवित्र असून पुराणात या विषयी अशी कथा आहे की, याचा उगम गरुड पक्षाच्या पंखापासून झालेला आहे. त्या गरुडाचे पंख सोमरसात भिजलेले असल्यामुळे ते पंख अमर आहेत व त्यापासून उत्पन्न होणारा वृक्ष सुद्धा अमर झाला आहे. याच्या लहान फांद्या आहुती देण्याच्या समिधा म्हणून उपयोगी पडतात. पळस या शब्दाचा अर्थ सामन्यात:हिरवे पान हा आहे.

कालिदासाचे विंध्य भूमीचे वर्णन करताना असे म्हटले आहे. “वनांमध्ये फुललेल्या, अग्निसारख्या लाल फुलांनी नटलेला  पळस हा वृक्ष आहे“. कालीदासाला असे वाटले की, भूमीने जणू एखादा नववधू प्रमाणे तांबडे वस्त्रच परिधान केले आहे, असा भास होत आहे. पळसाचे लाल भडक वनव्यासारखे रूप पाहून मोरोपंतांनी त्यांच्या आर्येत म्हटले आहे. “पुष्पवर्ण नटला पळसाचा।पार्थ सावध नसे पळसाचा !

त्याच्या रक्तवर्णीय फुलांना बघून कदाचित पळसाला जंगलाचा वणवा (Flame of The Forest) असे नाव पडले आहे. प्राचीन कथेत अनेक वेळा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी व सतत तो तेवत ठेवण्यासाठी पळसाच्या लाकडाचा उल्लेख आहे. म्हणून या जंगलाचा वनव्याला पाहून जणू जुन्या काळी सुप्त राहिलेल्या अग्निच आपण पळसाच्या लाल भडक फुलांच्या रूपाने बाहेर पडताना पाहत आहोत असा  भास होतो.

विस्तार व वस्तीस्थान

पळस हा वृक्ष मुळचा भारतातलाच असून तो संपूर्ण देशभर आढळतो. याचे ब्युटिया हे नाव एका वनस्पतीशास्त्र अर्ल ब्युटे याच्या नावावरून तर मोनोस्पमा याच्या शेंगेत एक बी असल्याने पडले आहे. याची लहान मोठी झाडे बर्मा, ब्रम्हदेश व सिलोन येथे सापडतात. हा वृक्ष भारतात मुख्यत्वेकरून मध्यप्रदेश व पश्चिम घाट, सातपुडा या विभागात सापडतो. याशिवाय पंजाब उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल या प्रांतातही थोड्याबहुत प्रमाणात सापडतो. याच्या पिवळ्या फुलाची जात अत्यंत दुर्मिळ आहे.

झाडाचे सर्वसाधारण वर्णन

हा सर्वसाधारण उंचीचा पानझडी वृक्ष असतो याची पाने हिवाळ्यात गळून पडतात. वसंतात नवीन पालवी फुटते. याची पाने संयुक्त असून त्याला मोठ्या तीन पर्णीका असतात म्हणूनच याला म्हण पडली आहे “कुठेही जा पळसाला पाने तीनच”.  याचे खोड अस्ताव्यस्त वाकडे पिळदार, आकारहीन असते, त्याचा पृष्ठभाग खडखडीत राखाडी रंगाचा असतो. पळसाचा फुलोरा जानेवारी ते मार्च महिन्यात असून त्यावेळी झाड निष्पर्ण असते. याची फुले पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल भडक व गंधहीन असतात. यावल वनविभागातील वैजापूर वनक्षेत्रात पळस या वृक्षाचे स्थान असल्याने सर्वत्र पळसाने जणू काही अग्निरूप धारण केलेले दिसून येत आहे.

 

संकलन व फोटो 

 विजय शिरसाठ

 वनरक्षक यावल वनविभाग जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.