रुग्णवाहिकेचा ठेका रद्द करण्यासाठी चालढकल !

0

चालक मागणीवर ठाम : गिरीश महाजनांची घेतली भेट

जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका चालकांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन दिले नसतांनाही संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन चालढकल होत असून चालकांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून तिढा सोडविण्याची मागणी केली आहे.
जळगाव सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेवरील चालकांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकले असतांनाही ठेकेदार असलेल्या राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीने रुग्णवाहिका चालकांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. या संदर्भात रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा शल्स चिकित्सक, सहसंचालक (तांत्रिक), सहसंचालक (खरेदी) आरोग्य सेवा यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असतांनाही कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नाही. राज्यातील नांदेड, बीड, गोंदीया व पुणे येथील ठेके रद्द केले असतांना जळगावचा ठेका रद्द करण्यासाठी चालढकल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधीत ठेकेदार हा मनमानी पद्धतीने कारभार करीत असून त्याचा चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णांची ने-आण करतांना मनस्तापामुळे काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत असल्याने संबंधित ठेका त्वरीत रद्द करावी अशी मागणी जोर धरत आहे.

गिरीश महाजनांची घेतली भेट
जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी मंगळवारी मंत्री गिरीश महाजन यांची मुंबर्इत भेट घेवून संबंधित ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांच्याशी चर्चा करुन योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस
ठेकेदार असलेल्या राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीला गेल्या आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून कंपनीने अद्यापही खुलासा सादर केलेला नाही. येत्या दोन दिवसात ठेकेदारावर कशी कारवार्इ करावी याचे मार्गदर्शन वरिष्ठांकडून घेतले जाणार असल्याची माहिती खरेदी कक्षाचे सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.