पाचोरा तहसील परिसरात मुद्रांक विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेची दयनीय अवस्था

सर्वत्र घाणीचे साम्राज्य, पाण्यातून काढावी लागतेय वाट

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तहसील परिसरात घाणीचे साम्राज्य असून मुद्रांक विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेची दैन्यावस्था झाल्याने नागरिकांना पाण्यातूनच वाट काढत शासकीय कागदपत्रे तयार करून घ्यावी लागत आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे हेतुतः दुर्लक्ष होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासकीय कामकाजासाठी तालुक्यातील १२८ खेड्यांसह शहरातील नागरिक विविध प्रकारचे कागदपत्रे तयार करण्यासाठी मुद्रांक विक्रेत्यांकडे येत असतात. पाचोरा तहसिल आवारात अधिकृत जागा असतांना पाचोरा तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांना १०० मीटर अंतरावर जुन्या पडक्या नगर पालिकेच्या रुग्णालय इमारतीच्या आवारात अनधिकृत बैठक व्यवस्था केली आहे. या ठिकाणी मेलेल्या प्राण्यांची दुर्गंधी दररोज येत असून घाणीचे साम्राज्य तहसील परिसरात, ग्रामीण रुग्णालय परिसरात दिसून येत आहे. त्यातच गेल्या महिना भरापासून होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना ह्या गढूळ पाण्यातूनच वाट काढत स्टॅम्प वेंडरकडे स्टॅम्प घेण्यासाठी व विविध कागदपत्रे तयार करण्यासाठी जावे लागत आहे. ही पडकी इमारत धोकादायक असून केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असून स्टॅम्प वेंडर यांची बसण्याच्या व्यवस्थेची दयनीय स्थिती झालेली आहे. याप्रकरणी गेल्या ८ वर्षांपासून आ. किशोर पाटील यांच्याकडे जागेसाठी वारंवार मुद्रांक विक्रेते बैठक व्यवस्थेची मागणी करूनही दुर्लक्षच होत असून याबाबत नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
ह्या जागेचे मालक नगरपालिका असून इमारत पडक्या अवस्थेतील असून परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. कोणत्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही कचऱ्याचे ढीग साचलेले असून पाणीच पाणी तुंबलेले आहे.

मुद्रांक विक्रेत्यांची मागणी
गेल्या ८ वर्षांपासून परवाना धारक मुद्रांक विक्रेत्यांची दयनीय अवस्था झालेली असून, वारंवार मागणी करून निवेदने देऊनही अधिकृत शासनाच्या मुद्रांक विक्रीसाठी तहसील आवारात जागा दिली जात नाही. जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असून आ. किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रवीण चव्हाणके यांनी जनहितार्थ नागरिकांच्या सोयीसाठी अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांना तहसील कार्यालय आवारातच जागा उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकांसह मुद्रांक विक्रेत्यांची मागणी आहे.

कोट – आम्ही तहसील कार्यालय आवारात शासनमान्य २० परवाना धारक अधिकृत स्टॅम्प वेंडर असून वारंवार जागेची मागणी करूनही जागा मिळत नाही. जनतेला तहसील आवारातच मुद्रांक विक्री करण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही अनधिकृत जागेवर विक्री करतो हे आम्ही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या लक्षात आणून दिले असून आम्हास जागा देण्याबाबत आदेश केले आहे. तहसीलदारांनी लक्ष देण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.