पाचोरा पालिकेवर रस्त्यांच्या मागणीसाठी शेकडो नागरीक धडकले, आंदोलनाचा इशारा…

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा (Pachora) नगरपालिकेवर शहराच्या विविध भागातील रस्त्यांच्या कामांच्या मागणीसाठी शेकडो नागरिक पालिकेवर धडकले. मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांच्याशी संतप्त भावनेने चर्चा करून आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन देण्यात आले. शहरालगत वसलेल्या, शहराचे वैभव व पालिकेचे उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक नागरी वसाहतीं मध्ये विविध समस्यांचा सामना करत वास्तव्य करावे लागत आहे. वसाहतींमधील रस्त्यांची अवस्था जीवघेणी झालेली आहे. भुयारी गटारीचे काम अजून पूर्णत्वास आलेले नाही. या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते काही ठिकाणी तयार करण्यात आले. काही रस्त्यांची डागडूजी करण्यात आली तर काही भागातील रस्ते जैसे थे आहेत. शहरा लगतच्या उच्चभ्रू, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांचा रहिवास असलेल्या प्रभाग क्रं. ९ मध्ये रस्ते कामाला मंजुरी मिळाली असली तरी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रहिवाशांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे. या भागातील रहिवासी पालिकेचे सर्व कर वेळेवर व नियमित भरत असतांना शहरात इतरत्र रस्त्यांची व इतर विकास कामे होत असतांना प्रभाग क्रं. ९ मध्ये मात्र कामे का केली जात नाहीत ? याचा नगरपालिका प्रशासनाने खुलासा करावा.

पालिका प्रशासनाकडे अनेकदा कामांची मागणी केली परंतु पालिका त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. पालिकेला कोणाच्या व किती अपघात आणि बळींची प्रतीक्षा आहे ? नागरिकांच्या भावनांशी व जीविताची सुरू असलेला खेळ नगरपालिका किती दिवस खेळणार आहे ? रस्त्यांची दुर्दशा, त्यामुळे होणारे अपघात, असुविधा यामुळे रहिवाशांची जीवित हानी झाल्यास पालिका प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा संतप्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. रस्त्यांची कामे व इतर सुविधांच्या मागणीसाठी पालिकेवर धडकलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांच्याशी चर्चा करून कामे कधी होणार ? असा जाब विचारला असता येत्या दोन महिन्यात सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचे शोभा बाविस्कर यांनी आश्वासन दिले. त्यामुळे आश्वासनाप्रमाणे कामे न झाल्यास पुढे कोणतीही मागणी न करता आंदोलन छेडण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.