धावत्या रेल्वेखाली चिरडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

आपल्या नणंदच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन पुण्याहुन पाचोरा  (Pachora) येथे महाराष्ट्र एक्सप्रेसने (Maharashtra Express)  परतलेल्या पाचोरा येथील एका ४९ वर्षीय महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली (Rajdhani Express) सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १७ जुलै रोजी सकाळी ६:५० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिंदाड ता. पाचोरा येथील मुळचे ह. मु. स्वामी लाॅन्सच्या भडगाव रोड, पाचोरा येथील रहिवासी सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्या पत्नी सुनिता सुरेश पाटील ह्या चार दिवसांपूर्वी आपल्या तीन जावांसह पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नणंदच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम गेल्या होत्या. दरम्यान ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन दि. १६ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हापूरहुन गोंदियाकडे जाणाऱ्या डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस (क्रंमाक ११०३९) ने पाचोरा येण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान दि. १७ जुलै रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस ही सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर एक्स्प्रेसच्या शेवटी असलेल्या महिला राखीव जनरल डब्यात बसलेल्या तीन जावा व सुनिता पाटील ह्या प्लॅटफार्मवर उतरल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या मागुन अप लाईन क्राॅस करुन जात असतांना तीन जावा ह्या दुसऱ्या साईडच्या अपसाईडच्या प्लॅटफार्म वर चढल्या.

दरम्यान सुनिता पाटील यांच्याकडे बॅगांचे ओझे होते. याच वेळी दिल्लीहुन मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस (क्रंमाक २२२२२) ही भरधाव वेगाने येत असल्याचे सुनिता पाटील यांच्या लक्षात येताच त्यांची धडपड उडाली. राजधानी एक्सप्रेसच्या लोकोपायलटने जोरात हाॅर्न वाजवुन तसेच गाडी हळु करण्यासाठी ब्रेक देखील दाबला मात्र राजधानी एक्सप्रेस सुसाट वेगाने असल्याने लोकोपायलट यांचाही प्रयत्न व्यर्थ ठरला. नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. क्षणाताच सुनिता पाटील ह्या राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र पाचोराचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे त्यांच्या पथकासह पोहचुन पंचनामा केला. तसेच सुनिता पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व बबलु मराठे यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मयत सुनिता सुरेश पाटील यांच्या पाश्चात्य पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा रेल्वे स्टेशनचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

निष्पाप प्रवाशांना गमवावा लागत आहे जीव

पाचोरा रेल्वे स्थानकावरुन प्रवाशांना शहराकडे तसेच भडगाव रोडकडे जाण्यासाठी एकच ओव्हर ब्रीज आहे. रेल्वेतुन उतरल्यानंतर शहराकडे तसेच भडगाव रोडकडे वास्तव्यास असलेल्या प्रवाशांना आपल्या प्रवाशी बॅगांसह त्या एकमेव ओव्हर ब्रीज पर्यंत जाणे मोठे जिरकीचे असल्याने पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशी रेल्वे लाईन ओलांडून जात असतात. याआधीही अशा प्रकारामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमावाव लागला आहे. पाचोरा रेल्वे स्थानकावर जाण्या – येण्यासाठी ओव्हर ब्रीज मंजुर असुन सुद्धा रेल्वे प्रशासनाने त्याचे काम सुरू केले नसल्याने प्रवाशी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.