वृद्ध दाम्पत्यांनी विषारी औषध प्राशन करून संपविली जीवन यात्रा

तालुक्यातील लोहटार येथील खळबळजनक घटना....

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

वृद्ध दाम्पत्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना १० जुलै रोजी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत वृद्ध दाम्पत्यांची लोहटार येथुन एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहटार ता. पाचोरा येथील एस. टी. महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय – ७८) यांना सुरुवाती पासूनच अध्यात्माची आवड होती. महामंडळातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ईश्वर पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (वय – ७२) हे नियमित देवपूजा करुन अध्यात्मिक मार्गावर चालत असतांनाच ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिस स्टेशनचा टेलिफोन वाजतो.. समोरुन ईश्वर पाटील बोलतात.. मी व माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. आमच्या आत्महत्येस कोणासही कारणीभूत धरु नये. अशी माहिती पोलिस स्टेशनमध्ये देतातच. पोलिसांनी तात्काळ लोहटार गाठले असता ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले होते. वृद्ध दाम्पत्यांना तात्काळीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर वृद्ध दाम्पत्यास वाचविण्यास यश आले होते. मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. आणि तो दिवस अखेर उगविलाच १० जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्रकृती अचानक खालावली व काही क्षणातच प्रमिलाबाई पाटील यांचे दुःखद निधन झाले. या घटनेस काही तास उलटत नाही तोच सकाळी ८ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांचे देखील दु:खद निधन झाले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहे.

एकाच वेळी निघाली वृद्ध दाम्पत्यांची अंत्ययात्रा
लोहटार ता. पाचोरा येथील ईश्वर नामदेव पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील यांनी एकाच वेळी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. एक दिवस वृद्ध दाम्पत्यांनी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली. मात्र १० जुलै रोजी आधी प्रमिलाबाई पाटील व अवघ्या ६ तासांच्या अंतराने ईश्वर पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. अतिशय जड अंतःकरणाने वृद्ध दाम्पत्यांची लोहटार गावातुन एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आल्याने अनेकांची डोळे पाणावले होते.

आम्ही स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची सापडली चिठ्ठी
तालुक्यातील लोहटार येथील ईश्वर नामदेव पाटील व प्रमिलाबाई ईश्वर पाटील या दाम्पत्यास दोन मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ७ जुलै रोजी रात्री सर्व कुटुंबियांनी सोबत जेवण केले. सर्व काही सुरळीत होते. मात्र पहाटेच्या सुमारास अचानक ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील हे दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे जवळ एक चिठ्ठी आढळून आली असुन त्या चिठ्ठीत आम्ही दोघेही जीवनास कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करीत आहेत. आमच्या मृत्युस कोणासही कारणीभूत धरु नये. अशा आषयाची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.