पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:
पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये झाला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिंकदर शेख अंतिम फेरीत दाखल झाला होता, तर तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला धुळ चारत शिवराज राक्षेने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या रोमहर्षक लढतीत सिकंदर शेखने शिवराज राक्षेला आस्मान दाखवत ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला आहे.
मुळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील सिकंदरच्या घरात आजोबांपासून कुस्तीची परंपरा सिकंदर शेखचे वडिल रशिद शेखसुद्धा पैलवानकी करायचे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत सिकंदरनेही हा वारसा कायम राखला. सिकंदर शेख आणि शिवराज राक्षेमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखला सेमी फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. मात्र यंदा त्याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावून मागच्या वर्षी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण केले.