नवाविध भक्ति व नवरात्र: किर्तन

0

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख

समर्थ रामदास स्वामींनी ’दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात ’किर्तन’ ही बहिरंग साधना वर्णिली आहे, नवाविध भक्तीतील ही दुसरी पायरी आहे. कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीस ’किर्तन’ हे सर्वश्रेष्ठ साधन आहे.

“भगवंतासी किर्तन प्रिय । कीर्तन समाधान होय I 

“बहुत जनासी उपाय । हरिकिर्तन कलियुगी I”

 

किर्तनात पूर्व रंग व उत्तर रंग असतात. पूर्व रंगात वेदान्त व सिद्धान्त असतो, उतर रंगात त्यास अनुसरून संतचरित्रे, देवांच्या कथा,  भगवंताचे चरित्र, रामकृष्णादि अवतारांचे विशेष कथासार अंर्तभूत असतात.

किर्तन ही एक कला आहे. त्यासाठी पाठांतर, गायन, संगीत, नृत्य हे सारेच अवगत लागते. शास्त्र-सिद्धान्त, गद्य-पद्य,  सुभाषित, सुविचार सर्व अंगानी यात रंग भरावा लागतो. किंबहुना किर्तन संस्थेत जाऊन त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे लागते.  संत नामदेव महाराज म्हणतात तसे “नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥” हेच कीर्तनाचे साध्य असते. यात कोणताही प्रत्यवाय नाही. या कीर्तनातून अंत:करणात भगवद्प्रेम उत्पन्न होते, नव्हे कीर्तनकाराचे आचारण “बोले तैसा चाले’ असे असेल व श्रोतृवृंद ही उतम असेल. किर्तनात प्रत्यक्ष ’परमात्मा’ अवर्तीण होतो. तीर्थ व क्षेत्र दोन्ही दर्शन  घडते. फक्त वक्ता हाच अनुभवाचा लागतो.

“प्रचितीवीण जे बोलणे । ते अवघेचि कंटाळवाणे ॥

“तोंड पसरोनि जैसे सुने । रडोनि गेले ॥”

समर्थ शिष्या वेणाबाई किर्तन करीत तेव्हा ते ताकदीचे होत असे कारण सद्गुरुकृपा व सतशिष्य यातून अनुभवसिद्ध बोलणे घडते व लोकांना मायेतुन बाहेेर काढण्यासाठी ते ज्ञानामृताचे काम ही करते. संतश्रेष्ठ गाडगेमहाराज कीर्तनापूर्वी खराटा घेऊन अंगण, रस्ते साफ करीत व मग नामाचा गजर करीत, “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” व समाजप्रबोधन करीत ‘शिक्षण घ्या, कर्ज काढून लग्न करू नका, व्यसन कोणती करू नका ,गाव स्वच्छ व सुंदर ठेवा’ त्यांचे किर्तन ताकदीचे ठरत असे. अशा कीर्तनात खरा रंग चढतो व तिथे प्रत्यक्ष परमात्मा श्रीरंग ही उपस्थित राहतो.

आज आपण दुसरी पायरी चढत आहोत. सगळ्यांना तारणारी आणि संजीवनी देणारी ’जगदंबा’आज चौसष्ट योगिनी एकत्र आल्या आहेत. त्यात परशुरामाची जननी मुख्य आहे. तिचा कस्तुरी मळवट आहे व भागांत शेंदूर भरलेला आहे. सकळ चामुंडा ‘उदो उदो उदो’ असा जयजयकार करीत आहेत. ही जगदंबा ’कल्पवृक्ष’ आहे व प्रत्येक जीव तिथे आश्रित आहे. सर्व आबालवृद्धांचा, उपासकांचा ती संभाळ करीत आहे. तिच्या महात्म्याला कुठेही गालबोट लागु नये म्हणून, आपण आपली करत आहोत ती भक्ती तपासून पहायची आहे व त्यादृष्टीने पाऊल उचलायचे आहे. सगुणांकडून निर्गुण निराकार अशा या माय भवानीकडे आपणा सर्वांना प्रवास करावयाचा आहे. संत एकनाथमहाराज म्हणतात,”अनादि निर्गुण प्रकटली भवानी।मोहमहिषासूर मर्दानी लागुनि । त्रिविध तापाची, करावया झाडणी। भक्तालागी तू पावसी निर्वाणीII”. आपल्या त्रिविध तापांची ती शांती करणार आहे.

मी शरीर आहे ही धारणा केल्यामुळे देह-इंद्रिय, मन आणि प्राण यांना जी सुखदुःखाची अनुकूल किंवा प्रतिकुल संवेदना होते तो ताप प्रत्येकाच्या वाटयाला आलेला असतो. तो अध्यात्मिक ताप समजला जातो. तर जगाशी संबंध आल्यामुळे जे दु:ख पदरात पडते ते अधिभौतिक तापात गणले जाते आणि आपल्या अनेक जन्माच्या शुभ व अशुभ कर्माचा परिणाम मृत्युनंतर भोगावा लागतो. स्वर्ग नरक संकल्पना यातून जन्म घेतात. ईश्वर हा महाकाय संगणक आहे. ’घडे भोगणे पाप ते कर्म खोटे’ वासना संपल्या की प्रारब्ध संपते व जीव आत्मस्वरुपात विलीन होतो.

॥ उदे ग अंबे उदेII

II उदे ग अंबे उदे ॥

 

भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड, पुणे

 

84129 26269

Leave A Reply

Your email address will not be published.