नवाविध भक्ति व नवरात्र – श्रवण

0

नवरात्री विशेष लेख 

 

समर्थ रामदास स्वामी यांनी ’दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात प्रथम समासात ’श्रवण’ भक्तीचे वर्म व मर्म सांगितले आहे. ’श्रवण’ अवश्य करावे किंबहुना केवळ एकांगी श्रवण न करता सर्व विषयांवरचे ज्ञान ज्यातुन प्राप्त होते ते श्रवण करावे. त्यात औषधी, नाना पिंडाची रचना, भूगोल रचना, नवखंडे,चौदा भुवने हे ज्ञान श्रवणातुनच लाभते. चौसष्ट विद्या व कला यांच्या ज्ञानाचा उगम श्रवणात आहे. आजही आपल्याला सर्व विषयांचे ज्ञान श्रवणातुन मिळतेच.

पण समर्थांना श्रवणाचा अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या अंत:करणात भक्ती, प्रेमाचा, उदय होतो हा वाटतो व तोच अद्वितीय आहे. नारदीय भक्तीसुत्रात नारदजी ‘भक्ती म्हणजे परम प्रेम स्वरूप, अमृत स्वरूप’ असेच प्रतिपादले आहे. त्यामुळे भगवतांची सगुण चरित्रे, पुराण, आख्यान, देवांच्या जन्मकथा, नाना उपासना, सिद्धान्त मार्ग, मंत्राची महती, भगवंताचे गुण-गान, स्तुतीपर महती, भजने स्तवने ऐकत राहिल्याने भक्ती प्रेमाचाच उदय होतो. अन्यथा दिवसभर आपण संसारिक गोष्टीच बोलत राहिलो तर दिवस त्यातच व्यतीत होतो. म्हणून दिवसातील ठराविक वेळ अवश्य श्रवण करावे किंबहूना आपल्या देहरक्षणाकरिता जशी अन्न व पाणी याची नितांत गरज आहे तितकीच गरज जीवनामध्ये श्रवणाची आहे म्हणून भगवंताने कृपाळूपणे आपल्याला दोन कान दिलेत. ऐकावे खूप त्यामानाने बोलावे कमी हे अधोरिखीत आहे. निंदा-वाईट गोष्टी एका कानाने ऐकाव्यात व दुसऱ्या कानाने सोडून द्याव्यात.

पण भगवंताची सगुण कथा किंवा निर्गुण-निराकार रुपाच निरुपण मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे अवधान देऊन ऐकले,लक्ष केंद्रित केले तर व्यक्ती सर्व सुखाला प्राप्त होते इतके श्रवण परिणामकारक आहे. नाना व्रतांचे, तीर्थांचे, दानाचे, मंत्राचे,नाना साधना कशा कराव्यात हे ऐकावेच पण समर्थ म्हणतात असार जाणून त्यागावे व सार काय ते घेऊन, लक्षात ठेवून श्रवण करावे. श्रवण ही बहिरंग साधना आहे. पण ज्ञानाचे उगमस्थान ही तेच आहे. पण ज्ञानाचे त्यादृष्टीने डोळसपणे श्रवण करावे, भक्तीचे मूळ शोधावे.

आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आपण देवीमहात्म्य वाचणार आहोत,ऐकणार आहोत. देवी अथर्वशीर्ष स्वतः म्हणणार व आपल्याच कानाने ऐकणार आहोत. देवीचे पराक्रम, तिची शक्ती, ओज व तेज याचे आपण श्रवण करीत करीत एक प्रकारचे तेजोवलय, स्फूर्तिच प्रेरणेच स्फुलिंग आपला अंतकरणात प्रगट होणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस घरात मंदिरात घटस्थापना होणार आहे. ’ब्रह्मा-विष्णू-रुद्र’ आईचे पूजन करणार आहेत. आपणही केवळ घरात, मंदिरात नाही तर आपल्या हृदयात चौरंग मांडुया त्यावर जगदंबेला बसवू या. नक्षत्राच्या कवड्या गुंफन तिच्या गळ्यात हार घालू या. बाल रवीचा मळवट भरू या. सोन केशरी शालूने तिला सजवू या. आणि ओले श्रीफल तिला अर्पण करु या. मग ती ओटीत श्रीफल ठेवताच आपल्याकडे पाहून आपली दया येऊन ती दयामनी हसेल आपल्या या मानसपुजेला इतका रंग चढेल की देहात संबळ वाजू लागेल ’उदे उदे उदे’ असा ध्वनी उमटेल. कुंडलीनी शक्ती जागृत होईल.ती नाचत नाचत आकाशात म्हणजे ब्रहरंधात प्रवेश करेल, सहज अवस्था प्राप्त होईल.

बोधाचा काकडा हातात घेऊ या म्हणजे ज्ञानाचा काकड़ा हातात घेऊन पवित्र व मंगलमय वातावरणात तिचे मनोभावे पूजन करूया.

॥ उदे ग अंबे उदे II

II उदे ग अंबे उदे ॥

 

भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड, पुणे

84129 26269

 

Leave A Reply

Your email address will not be published.