माजी कुलसचिव हत्या प्रकरण; संशयितला घेत पोलिसांनी गाठले ‘आंबोली’

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक : येथे मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०), त्यांचा पुत्र अमित कापडणीस या दुहेरी हत्याकांडाबाबत संशयित राहुल जगताप (३५) याने पोलिसांकडे कबुली दिली आहे. दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी केली जात असून, अधिकाधिक परिस्थितीजन्य पुरावे संकलनाकरिता सरकारवाडा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. रविवारी (दि.२०) दुपारनंतर पोलिसांनी संशयित जगताप यास सोबत घेत थेट आंबोली घाट गाठले. पोलिसांनी त्याच्याकडून नानासाहेबांच्या मृतदेहाच्या विल्हेवाटबाबत ‘ऑन द स्पॉट’ माहिती जाणून घेतली.

नानासाहेब कापडणीस यांना शहरातून गेल्या डिसेंबर महिन्यात स्विफ्ट मोटारीत बसवून संशयिताने थेट मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील आंबोली घाट गाठले होते. वाटेत नानासाहेबांचा गळा आवळून खून करत, त्यांचा मृतदेह संशयित जगताप याने घाटातील दरीत फेकला होता. मृतदेह दोन झाडांच्या मध्यभागी अडकल्याने, संशयिताने मोठा दगड मृतदेहाच्या दिशेने फेकून तो अधिक खाली कसा जाईल, यासाठी प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

रविवारी संशयित जगतापला घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे हे चमूसह घेऊन गेले. तेथे मयत नानासाहेब यांच्या अंगावरील कपड्यांचा शोध घेण्यात आला, तसेच जगताप याने कुठून त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिला. त्या जागेची पाहणी करत बारकाईने शास्त्रोक्त पद्धतीने बारकावे नोंदविण्यात आले.

अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरूपाच्या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर, पोलिसांकडून आता परिस्थितीजन्य भक्कम पुरावे शोधून संकलित केले जात आहे. संशयित जगताप याने मृतकाला विवस्त्र करत, त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिला होता. चेहरा छिन्नविच्छिन्न झाल्यामुळे मोखाडा पोलिसांना ओळख पटविणे जिकिरीचे ठरत होते. मात्र, मृतदेहाच्या अवस्थेवरून अज्ञात वयोवृद्ध व्यक्तीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत, त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

आज होणार ‘स्विफ्ट’चे परीक्षण पूर्ण

गुन्ह्यात वापरलेल्या राखाडी रंगाच्या मारुती स्विफ्ट कारचे परीक्षण सोमवारी (दि.२१) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून पूर्ण करण्यात येणार आहे. स्पॉट पंचनामा केल्यानंतर स्विफ्ट कार प्रयोगशाळेत हलविण्यात आली आहे.

अधिक बारकाईने शास्त्रीयदृष्ट्या परीक्षण करून महत्त्वाच्या नोंदी प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांकडून घेतल्या जाणार आहे. कारण या दुहेरी हत्याकांडासाठी वापरलेल्या या मोटारीच्या परीक्षणातील नोंदी पुढील तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.