निवडणूक प्रक्रियेत माहितीची शुद्धता महत्वपूर्ण घटक; उपायुक्त रमेश काळे

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नवीन मतदार नोंदणी पासून ते दुबार नावे वगळणे, माहिती अद्ययावत करणे ही कामे प्रशासकीय पातळीवर केली जात आहेत. संकलित करण्यात आलेली माहितीची शुद्धता ही निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्वपूर्ण घटक असून यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी त्रूटी टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना उपायुक्त सामान्य प्रशासन नाशिक विभाग रमेश काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा नोडल अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, उपजिल्हाधिकारी (राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प) शर्मिला भोसले, रवींद्र भारदे (भुसंपादन), शाहूराज मोरे (पूनर्वसन), अतुल चोरमारे (अहमदनगर), उपविभागीय अधिकारी शिरपूर प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी बबन काकडे (बागलाण), आप्पासाहेब शिंदे (दिंडोरी), महेश सुधळकर (जळगाव), नितिन सदगीर (मालेगाव), तहसिलदार मंजुषा घाटगे (निवडणूक शाखा), नायब तहसिलदार राजेश अहिरे यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

उपायुक्त रमेश काळे म्हणाले, नोडल अधिकारी हे प्रादेशिक अधिकाऱ्यांना सहाय्य करणार आहेत त्यादृष्टीने एकमेकांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीन फेब्रुवारी महिना हा महत्वाचा असून सर्वानी निवडणूकीच्या अधिसूचना, निवडणूक संदर्भातील मार्गदर्शक सूचना, कायदे व नियम यांचे वाचन करून त्यासंदर्भात आवश्यक नोंदी काढल्यास निश्चितच त्याचा उपयोग येणाऱ्या काळात होणार आहे. नवनवीन ऑनलाईन ॲप्लीकेशनबाबत माहिती करून त्यांचा उपयोग अधिकाऱ्यांनी करावा. आदर्श आचार संहिताबाबत नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या टिमचे प्रशिक्षण घेतल्यास आवश्यक नियम, सूचना याबाबात दक्ष राहून कामकाज होईल. निविदा प्रक्रियाही अधिकाऱ्यांनी वेळेत करून घ्यावी. उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म ऑनलाईन अपलोड करतांना सर्व बाबी व आवश्यक पूर्तता अचूक पाहूनच अपलोड करावेत अशा सूचनाही नोडल अधिकारी यांनी

संबधित यंत्रणेला द्याव्यात. आजच्या प्रशिक्षणातील 16 विषय अत्यंत महत्वाचे आहेत. सर्व अधिकाऱ्यांना आजच्या प्रशिक्षण हे निश्चितच माहितीपर व शंका निरसण करणारे ठरेल. असे सांगत उपायुक्त रमेश काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक डॉ शशिकांत मंगरूळे प्रास्ताविकात म्हणाले, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यात निवडणूक आचारसंहिता हा महत्वाचा भाग सुरू झाला असून निवडणूक केंद्रीय अधिकारी यांना मदत करण्यासाठी 16 प्रकारचे निवडणूक अधिकारी नियुक्त करण्याचे भारतीय निवडणूक आयोगाने सूचित केले आहे. त्याप्रमाणे या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे प्रशिक्षण आज सुरू करीत आहोत. त्यादृष्टीने नोडल अधिकारी यांनी निवडणूक संदर्भातील नवनवीन बदल,नवीन ॲप्सची माहिती अवगत करून घ्यावी यासोबतच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अभ्यासासाठी माहिती उपलब्ध करून दिली आहे त्याचेही अधिकाऱ्यांनी अवलोकन करून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे डॉ. मंगरूळे यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.