नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती. दिवसभर चाललेल्या या बैठकीत ‘विकसित भारत : २०४७’ या मुद्दयावर आणि पुढील पाच वर्षांच्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याच्या आणि वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याच्या सूचना केल्या. चाणक्यपुरीतील राजनयिकांच्या परिसरातील सुषमा स्वराज भवन येथे ही बैठक पार पडली. मंत्रीपरिषदेच्या बैठकीत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच केंद्रीय सचिवदेखील सहभागी झाले होते. सुमारे ८ तास ही बैठक झाली. बैठकीत मोदींनी सुमारे तासभर आपल्या मंत्र्यांना संबोधित केले.
भाजपच्या अभियानासाठी दोन हजारांची देणगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या ‘राष्ट्र निर्माणासाठी दान’ या अभियानासाठी रविवारी दोन हजार रुपयांचे योगदान दिले. सोबतच लोकांना या अभियानाचा भाग बनत दान देण्याचे आवाहन केले. मोदींनी सोशल माध्यम ‘एक्स’वर देणगी दिल्याची पावती टाकली. भाजपच्या अभियानात योगदान आणि विकसित भारताच्या उभारणीच्या प्रयत्नांना बळकटी देताना आपल्याला आनंद होत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी सर्वांना नमो अॅपच्या माध्यमातून या अभियानात भाग घेण्याचे आवाहन केले.