आदिवासी विद्यार्थ्यांकडून लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नंदुरबार: आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या तळोदा येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपीक किशोर भरतसिंग पावरा (वय – ३९) रा. तलावडी ता. शहादा यास रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनमुळे प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांची शासनाने विनामुल्य शासकीय तळोदा होस्टेलमधे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या संदर्भाने सी. एच. चौधरी आर्टस, एम. जी. पटेल कॉमर्स व बी. बी. जे पटेल विज्ञान महाविदयालय, तळोदा येथे एफ. वाय. बी. ए. ला शिक्षण घेत असलेल्या एका आदिवासी विद्यार्थ्यानेेे व त्याच्या मित्रांनी होस्टेलला अॅडमिशन मिळावी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे माहे ऑक्टोबर २०२१ ला ऑनलाईन फॉर्म भरले होते.

त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये होस्टेल प्रवेश संबंधीची लिस्ट लागली होती. पण त्यात या विद्यार्थ्याचे व त्याच्या मित्राचे नाव नव्हते. त्यानंतर यांना दि.१७. ०२. २०२२ रोजी सायंकाळी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील क्लार्क पावरा यांचा दूरध्वनी आला व पैशांची मागणी केली.

त्यानंतर या विद्यार्थ्याने प्रवेशाच्या मोबदल्यात लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्याची दखल घेऊन आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर सापळा रचण्यात आला. तेव्हा कनिष्ठ लिपीक किशोर पावरा यांनी पंच व साक्षीदारांसमक्ष ७०००/- रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५०००/- रुपये लाचेची रक्कम तळोदा येथील जय अंबे नाश्ता कॉर्नर व भोजनालयाच्या बाजुस मिरा कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ठिकाणी स्विकारताच रंगेहाथ पकडण्यात आले.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे आरोपी किशोर भरतसिंग पावरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश आनंदराव चौधरी, पोलीस निरीक्षक  माधवी समाधान वाघ, पोलीस निरीक्षक समाधान महादु वाघ, पोलीस हवालदार उत्तम महाजन, विलास पाटील, विजय ठाकरे, संजय गुमाने, पोलीस नायक अमोल मराठे, चित्ते, देवराम गावीत, महिला पोलीस नायक ज्योती पाटील, महाले, अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.