हिंदुस्तानी भाऊ ला पुन्हा पोलिसांनी बजावली नोटीस

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नागपूर : विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून बेकायदेशीर आंदोलन तसेच हिंसक कृत्य करून घेण्याच्या आरोपात गुन्हा दाखल असलेला विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊ याला जबाब नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटिसीप्रमाणे २२ फेब्रुवारीला त्याला नागपुरात हजर राहायचे आहे.

दहावी – बारावीच्या ऑफलाइन परीक्षेच्या संबंधाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मेसेज पाठवून विकास पाठक याने मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बेकायदा आंदोलन करण्यास प्रवृत्त केले होते.

त्याच्या या कृतीमुळे जागोजागी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती. नागपूरसह अनेक ठिकाणी तोडफोडही झाली होती. कोरोनाचा धोका वाढला असताना त्याने जागोजागी गर्दी जमवल्यामुळे संसर्गाचा धोका अधिकच तीव्र झाला होता.

या पार्श्वभूमीवर, मुंबईसह नागपूर पोलिसांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला विकास पाठकविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, ३१ जानेवारीच्या रात्री त्याला मुंबई पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी घेतली. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. १७ दिवस कोठडीत काढल्यानंतर विकास ऊर्फ हिंदुस्तानी भाऊ आज कोठडीतून बाहेर आला.

आता नागपूर पोलिसांनी त्याच्या आदरातिथ्याची व्यवस्था करून ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर, त्याला शहर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. २२ फेब्रुवारीला न चुकता अजनी ठाण्यात चाैकशीसाठी हजर राहण्याचे त्याला या नोटिसीतून बजावण्यात आले आहे.

चाैकशीनंतर ठरवू : पोलीस आयुक्त

विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊची नागपुरात चाैकशी केल्यानंतर काय कारवाई करायची, त्याचा निर्णय घेतला जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.