मुक्ताईनगर शुगर कारखाना व्यवस्थापनाने बंद ठेवण्याचा निर्णय

0

मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताई शुगर अँड एनर्जि लिमिटेडचा दहावा ऊस गाळप हंगाम सध्या सुरु आहे. गळीत हंगाम सुरु होऊन ५६ दिवस पूर्ण झालेले आहेत. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे गळीत हंगाम संथ गतीने सुरु आहे. प्रोग्रामनुसार ऊस व पुरेसा साखर उतारा मिळण्यासाठी दैनिक गाळप क्षमतेएवढा ऊस उपलब्ध होत नाही. सध्यास्थितीत कारखाना फक्त ८ तास चालवून उर्वरित १६ तास बंद ठेवावा लागतो. त्यामुळे कारखाना चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. कार्यक्षेत्रात कारखाना गाळप क्षमते इतका ऊस उपलब्ध होईल, या अपेक्षेत गत १० वर्ष आर्थिक झळ सोसून कारखाना चालवण्यात आला. परंतु, कारखान्याचे वाढत जाणारे तोटे विचारात घेता कारखाना व्यवस्थापनाने पुढील सन २०२४-२५चा गाळप हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी सांगितले.
चालु हंगामात ऊस तोड झालेल्या व होणाऱ्या क्षेत्राचे खोडवा क्षेत्र संबंधित ऊस पुरवठादारांनी मोड करावे. अथवा आपापल्या जबाबदारीवर खोडवा क्षेत्राची
घोडसगाव
विल्हेवाट लावावी. तसेच पुढील हंगामासाठी नवीन लागवड केलेल्या ऊस क्षेत्राची इतर कारखान्यास नोंद करुन घ्यावी. भविष्यात उभे राहणारे खोडवा क्षेत्र अथवा नवीन लागवड क्षेत्राच्या ऊसाची जाबाबदारी कारखाना स्वीकारणार नाही, याचीही संबंधित ऊस पुरवठादारांनी कृपया नोंद घ्यावी. कारखान्यास होणारे सततचे आर्थिक नुकसान विचारात घेता मुक्ताई कारखान्याच्या भरोशावर यापुढे ऊस लागवड करु नये. मागील १० वर्षात सर्व शेतकऱ्यांनी व इतर सर्वांनी कारखान्यास सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांना धन्यवाद देतो व सर्वांचे आभारी आहोत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच ज्या ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडे कारखाना अॅडव्हाँन्स येणे बाकी, शिल्लक असेल अशा ठेकेदारांनी कारखान्याची येणे बाकी असलेली रक्कम भरणा करुन आपापले ७/१२ खाते उताऱ्यावरील बोझा कमी करुन घ्यावा. कारखाना बंद झाल्यानंतर बोजा कमी करण्यासाठी होणारा विलंब व गैरसोय टाळावी, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन
शिवाजीराव जाधव यांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.