पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

0

वाळूज / ;– पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (दि.११) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली.

वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात राहणारे बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अबरार जावेद शेख (१२), अफरोज जावेद शेख (१४) व एक १४ वर्षीय अनोळखी असे चार जण गुरुवारी दुपारी गावाजवळील बनकरवाडी पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाइल दिसून आले. ते पालकांनी ओळखल्याने मुले अफरोज शेख अबरार शेख बुडाल्याची खात्री झाली. ही माहिती येथील उद्योजक प्रभाकर महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, जावेद शेख, साईनाथ जाधव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांनी तलावात मुलांचा शोध सुरू केला.

दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे पी. के. चौधरी, के.टी. सूर्यवंशी, एन.एस. कुमावत, पी.के.हजारे, एस.बी. महाले, वाय.डी. काळे, एस.बी. शेंडगे आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. चारही मुलांचे मृतदेह ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून घाटीत रवाना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.