भावना गवळी भाजपच्या वाटेवर ?

अचानक फडणवीसांच्या घरी भेट, तिकिटासाठी पक्षांतराची चर्चा

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील धरमपेठ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीच्या अनुषंगाने चर्चा झाली. गवळी यांना भाजपकडून निवडणूक लढविण्याविषयी विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसऱ्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हा संभ्रम कायम आहे.

खासदार भावना गवळी यांनी सहाव्या टर्मसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. भाजपकडून गवळी यांच्याऐवजी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नावाला पसंती दर्शविण्यात आली. या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून दावेदारी वाढली असताना मोहिनी नाईक यांचे नाव समोर आले. काही दिवसांपूर्वी या तिन्ही नेत्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भूमिका मांडली होती. तरीही उमेदवारीचा गुंता सुटत नसल्याने वाशीममधील जनसंपर्क कार्यालयात खा. गवळी यांच्या समर्थकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. हे सारे घडत असतानाच सोमवारी सायंकाळी खा. गवळी यांनी नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राठोड यांनी लोकसभा लढण्यात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केल्याचीही चर्चा आहे.

बोलण्यास दिला नकार

खा. गवळी या भेटायला येणार असल्याची पूर्वसूचना फडणवीस यांना नव्हती. फडणवीस प्रचारासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, गवळी भेटीला आल्याचे समजताच ते घरी परतल्याचेही सूत्रांनी सांगितले. भावना गवळी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यांतर माध्यमांना बोलायचे टाळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.