बापरे: आईच्या मृतदेहासोबत 1 वर्ष राहिल्या मुली, दुर्गंधी..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाराणसीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन मुली तब्बल एक वर्षांपासून आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. आईच्या मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झाल्यानंतरही मुलींनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुली अनेक दिवसांपासून घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. यानंतर नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा तेथील चित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगाडा झालेला मृतदेह घराबाहेर काढत ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस सध्या दोन्ही मुलींची चौकशी करत आहेत. मृतदेह घरात का ठेवला होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

लंका पोलीस ठाणे क्षेत्राच्या मदरवा येथे ही घटना घडली आहे. येथील एका निर्जनस्थळी असणाऱ्या घरातून पोलिसांनी उषा त्रिपाठी (वय 52) नावाच्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह गेल्या एक वर्षांपासून घरात पडला होता. महिलेच्या दोन्ही मुली या मृतदेहासोबतच राहत होत्या. मोठी मुलगी पल्लवी त्रिपाठी (वय 27) पोस्ट पदव्युत्तर असून, छोटी मुलगी वैश्विक त्रिपाठी (17 वय) दहावी उत्तीर्ण आहे. घरात ठेवलेल्या उषा त्रिपाठी यांच्या मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झाला होता. मृतदेह चादरीत गुंडाळून एका खोलीत ठेवण्यात आला होता. मुलींनी सांगितल्यानुसार, 8 डिसेंबर 2022 रोजी तब्बेत बिघडल्याने आईचा मृत्यू झाला. वडील काही वर्षांपूर्वी घर सोडून गेले आहेत.

अशी उघड झाली घटना

मुली मागील अनेक दिवसांपासून घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी उषा त्रिपाठी यांच्या मिर्झापूरमधील नातेवाईक धर्मेंद्र चतुर्वैदी यांना कळवलं. यानंतर धर्मेंद्र पत्नीसह घरी पोहोचली. घऱाचा दरवाजा उघडला असता दोन्ही मुली उषा त्रिपाठी यांच्या मृतदेहासह बसल्या होत्या. हे पाहिल्यानंतर धर्मेंद्र चतुर्वैदी यांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मुलींनी गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या दोन्ही मुलींची चौकशी केली जात आहे. दोन्ही मुलींनी आईचा मृतदेह एका खोलीत लपवला होता. दुर्गंध पसरु नये यासाठी त्यांनी अगरबत्तीचा वापर केला. दरम्यान शेजारी घर नसल्याने लोकांनाही समजलं नाही.

मागील एक वर्षांत जेव्हा नातेवाईक घऱी येत असत तेव्हा मुली आईची तब्येत बरी नाही सांगत त्यांना परत पाठवत असत. त्या कोणालाही आईला भेटू देत नव्हत्या. दरम्यान मुली शेजाऱ्यांकडून पैसे उधार घेत तसंच दागिने विकून घऱ चालवत होत्या असं समजलं आहे. दोन्ही मुलींची मानसिक स्थिती चांगली नसल्याचं पोलीस म्हणाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.