खाद्यसंस्कृती; मोमोज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंडियन स्ट्रीट फूड मध्ये गेले कित्येक वर्षे चायनीज फूडने भारतीयांना वेड लावलं आहे. या चायनीज फूडची यादी देखील खूप मोठी आहे, आणि सर्व खव्वयांना त्याची चटक देखील लागली आहे. मग त्यात येणारे चायनीज भेळ, पकोडे, मंचुरीयन, सुप्स, नूडल्स, चायनीज राइस, आणि बरेच काही पदार्थ. अरे हो मोमोज (Momos) विसरले, ते कसे विसरून चालणार, ते सुद्धा आहेतच की.. नाही हो विसरले नाही मी मुद्दामच ते लिहिले नाही, कारण ते काही चायनीज नाहीत बरं का, मोमोज चीनीइतकेच भारतीय आहेत. ठिक आहे तर मग आज मोमोज मूळचे कुठले आहेत आणि कसे आहेत ते पाहूयात..

मोमो

हा शब्द चीनी असला, तरी पदार्थ हा तिबेट मधून आलेला आहे. याला डंम्पलिंग, आणि डिमसिम या नावाने सुद्धा काही प्रांतात ओळखले जाते. मोमोज हा पदार्थ अँपटायझर्स मध्ये येतो. त्यांची ओळख ही तिबेटियन प्रदेशातून झाली असून ती नेपाळमधील आणि भूतानमधील लोकांमध्ये तसेच सिक्कीम राज्य आणि दार्जिलिंग, लडाख भागात सुद्धा प्रसिद्ध आहेत. (पूर्व-दक्षिण आशिया सीमेच्या हिमालयी प्रदेशात व तिबेटमध्ये सर्वात लोकप्रिय फास्ट फूड हे मोमोज आहे. (तिबेट, भूतान, नेपाळ, दार्जिलिंग, लडाख))
दोन प्रकारांमध्ये मोमो मिळतात. १. व्हेज २. नॉनव्हेज आणि त्यामध्ये १) वाफवलेले २) तळलेले असे दोन प्रकार मिळतात. आजकाल तंदूर आणि बेक मोमोज देखील मिळत आहेत.
पण जेव्हा मी एखादी रेसिपी बनवते तेव्हा ती थोडी इनोव्हेटिव्ह आणि हेल्दी, ट्विस्ट अशी असते, चला तर मग आटापासून (कणकेपासून) बनवलेले मोज पाहूयात.

व्हिट वेजी-नूडल्स मोमोज :

साहित्य :

१ वाटी गव्हाचे पिठ, २/३ चमचे तांदळाचे पिठ, १/२ पॅकेट नूडल्स, २ गाजर, १ सिमला मिर्ची,१/२ पत्तागोबी, १ कांदा, २ हिरवी मिरची, १ लसूण, आलं, १ कांदा पात, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, सोया सॉस, चिली सॉस, मिठ, तेल

कृती :
मोमोजच्या पारीसाठी:

प्रथम, १ वाटी गव्हाचे पिठ, २ चमचे तांदळाचे पिठ, मीठ, २ चमचे तेल घालून थोडेसे पाणी घालून कणिक मळून घ्या.
मऊसर व हाताला चिकटणार नाही अशी कणिक मळून १ तास ओलसर कपड्याने झाकून ठेवा.

वेज मोमोज स्टफिंग :

१) सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. नूडल्स उकडून घ्यावे.
२) एका कढईत तेल गरम करा, लसूण- आलं-हिरवी मिरची परतून घ्या. त्यानंतर कांदा टाकून गुलाबी रंग होईपर्यंत परता.
३) नंतर सिमला मिरची, कोबी, गाजर २ मिनिटे परतवून आता त्यामध्ये उकडलेले नूडल्स घालून वरतून थोडे मीठ टाकून परतवून घ्या
४) आता त्यामध्ये १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, २ चमचे सोया सॉस, १ चमचा चिली सॉस घालून कांदा पात घालून चांगले मिक्स करुन घ्या.
५) हे सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.

मोमोजवकृती:
१) एक तासानंतर तयार केलेले पीठ घेवून त्याचे समान एकसारखे गोळे करून घ्यावे.
२) त्या गोळीची पुरीच्या आकारात पोळी लाटून त्याच्या मध्यभागी तयार केलेले सारण भरून त्याचे वेगवेगळ्या आकाराचे मोमोज बनवून घ्यावे.
३) तयार केलेले मोमोज मोदक चाळणीला तेल लावून १०/१५ मिनिटे उकळण्यासाठी ठेवावे.
४) हे तयार असलेले मोमोज गरम तेलात तळून घ्यावेत म्हणजे आपले फ्राय मोमोज तयार होतील.
शेजवान चटणी सोबत या गरम गरम मोमोजची टेस्ट अजून वाढते.

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे.
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.