मोबाईल खरेदीच्या बहाण्याने चोरी; पिता- पुत्र जेरबंद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील  गोलाणी मार्केट येथील दुकानात मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने तब्बल १ लाख ६५ हजार १७० रूपये किंमतीचे महागडे ११ मोबाईल चोरी करणारे पिता-पुत्राला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. कैलास श्रीबलराम लालवाणी (वय ४८) आणि सुमित कैलास लालवाणी (वय २३) दोन्ही रा. वारसीया परीसर सिंधी कॉलनी, बडोदरा (गुजरात) अशी दोघा पिता पुत्रांची नावे आहेत.

शहरातील गोलाणी मार्केटमधील गुरूकृपा मोबाईल केअर या दुकानावर संशयित आरोपी कैलास लालवाणी आणि सुमिल लालवाणी मंगळवार १४ जून रोजी दुपारी आले. मोबाईल घेण्याच्या बहाण्याने त्यांनी तब्बल १ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे महागडे ११ मोबाईल लांबविले.

याप्रकरणी  बुधवार १५ जून रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चोरीचे मोबाईल घेवून संशयित आरोपी पिता-पुत्र मुंबईच्या दिशेने रेल्वेने गेल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेण्याकामी सहायक फौजदार रवि नरवाडे, स. फौ. युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ संदिप पाटील, पोना प्रविण मांडोळे आदींचे पथक रवाना करण्यात आले. लोहमार्ग पोलीस स्टेशन नाशिक व रेल्वे सुरक्षा बल नाशिक यांच्याशी संपर्क साधून दोघा पिता पुत्रांना नाशिक येथून ताब्यात घेत अटक करण्यात आले.

दरम्यान दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांच्यावर मध्यप्रदेशातील इंदौर येथील पोलीस ठाणे आणि जोतपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शिवाय अकोला, मुंबई, पुणे, कोटा अशा विविध शहरांमध्ये अशा प्रकारे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.