MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

परीक्षेत नापास झाल्यामुळे तरुणी नैराश्यात असल्याची माहिती मिळाली आहे.  त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

19 वर्षीय दिव्या यादव ही दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. गुरुवारी ती कॉलेजमधील संजीवनी या मुलींच्या जुन्या वसतिगृहातील खोली क्रमांक 64 मध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाची ही खोली रिकामी असायची.

खोली आतून बंद असल्याने वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. मात्र, तोपर्यंत दिव्याचा मृत्यू झाला होता. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिचा मृतदेह फासावरुन बाहेर काढला आणि पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

चौकशीदरम्यान, दिव्याच्या रुम पार्टनर्सकडून माहिती मिळाली की दिव्या नुकत्याच झालेल्या दोन पेपरमध्ये नापास झाली होती. 29 डिसेंबरला संध्याकाळी निकाल जाहीर झाला, तेव्हापासून ती निराशेत होती.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना दिव्याच्या रजिस्टरमधून एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ही चिठ्ठी तिने आपल्या कुटुंबासाठी लिहिली होती. फॉरेन्सिक तपासणीत तिचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर दिव्याचे शवविच्छेदन करून मृतदेह तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.