लोकशाही न्यूज नेटवर्क
रिक्षा घेण्यासाठी पत्नी माहेरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून पतीने फावड्याच्या दांड्याने मारहाण करत गळा दाबून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण, टिटवाळा परिसरात ही घटना घडली असून, निर्दयीपणाचा कळस म्हणजे हत्येनंतर पत्नीचा मृतदेह एका ड्रममध्ये भरून ड्रम जंगलात फेकून दिला होता. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी मैनुद्दीन अन्सारी याला बेड्या ठोकल्यात आहेत. अलीमुन अन्सारी असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणजवळ टिटवाळा मांडा परिसरात मैनुद्दीन अन्सारी पत्नी अलीमुन व १० वर्षाच्या मुलासह राहात होता. मैनुद्दीनला रिक्षा घ्यायची असल्याने तो अलीमुनकडे माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी तगादा लावत होता. यावरून मेनुद्दीन व अलीमुनमध्ये वरचेवर वाद होत असत.दरम्यान त्यांचा दहा वर्षाचा मुलगा शाळेत गेला असताना पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी संतापलेल्या मैनुद्दीनने फावड्याच्या दांड्याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह एका ड्रममध्ये भरला आणि हा ड्रम टिटवाळा जवळच्या जंगलात फेकून दिला. केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसलेल्या मैनुद्दीनने याची माहिती तिच्या वडिलांना दिली आणि तुम्ही पण पोलीस स्टेशनला या असे सांगितले. माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि मैनुद्दीनला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.